झिंबाब्वेचा तीन गड्यांनी पराभव : मॅथ्यूज सामनावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान लंकेने झिंबाब्वेचा 3 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात लंकेने शेवटच्या चेंडूवर आपला विजय नोंदविला. 46 धावांची खेळी करणाऱ्या अँजेलो मॅथ्यूजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वेने 20 षटकात 5 बाद 143 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 20 षटकात 7 बाद 144 धावा जमवित सामना जिंकला.
झिंबाब्वेच्या डावामध्ये कर्णधार सिकंदर रझाने 42 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 62 धावा जमविल्या. टी. केमुनहुकेमीने 18 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, एरविनने 2 चौकारांसह 10, सिन विल्यम्सने 20 चेंडूत 14 धावा, बेनेटने 1 चौकारासह नाबाद 10 तर जाँग्वेने 2 चौकारासह नाबाद 13 धावा केल्या. लंकेतर्फे महेश तिक्ष्णा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी 2 तर चमिराने 1 गडी बाद केला. झिंबाब्वेच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. पहिल्या पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात झिंबाब्वेने 38 धावा जमविताना 2 गडी गमाविले. झिंबाब्वेचे अर्धशतक 50 चेंडूत तर शतक 92 चेंडूत झळकले. सिकंदर रझाने 37 चेंडूत आपले अर्धशतक 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नोंदविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला पहिल्या षटकापासूनच गळती लागली. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निषांका एन्गरेवाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 धावा जमविल्या. कुशल मेंडीस आणि कुशल परेरा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 30 धावांची भर घातली. कुशल परेराने 3 चौकारांसह 17 तर कुशल मेंडीसने 15 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. समर विक्रमाने 1 चौकारासह 9 धावा केल्या. असालेंकाने 22 चेंडूत 1 चौकारासह 16 धावांचे योगदान दिले. मॅथ्यूज आणि शनाका यांनी सातव्या गड्यासाठी 55 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. मॅथ्यूजने 38 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 तर शनाकाने 18 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. चमिरा आणि शनाका यांनी विजयाचे सोपस्कार शेवटच्या चेंडूवर केले. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. पॉवर प्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात लंकेने 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. लंकेचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 97 चेंडूत फलकावर लागले. झिंबाब्वेतर्फे मुझार बनीने 33 धावात 2 तसेच कर्णधार सिकंदर रझाने 13 धावात 3 व मासाकेझा आणि एन्गरेवाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – झिंबाब्वे 20 षटकात 5 बाद 143 (सिकंदर रझा 62, केमुनहुकेमी 26, एरविन 10, विल्यम्स 14, जाँग्वे नाबाद 13, बेनेट नाबाद 10, अवांतर 3, तिक्ष्णा 2-16, हसरंगा 2-19, चमिरा 1-38), लंका 20 षटकात 7 बाद 144 (मॅथ्यूज 46, कुशल मेंडीस 17, कुशल परेरा 17, असालेंका 16, शनाका नाबाद 26, अवांतर 5, मुझारबनी 2-33, सिकंदर रझा 3-13, एन्गरेवा 1-34, मासाकेझा 1-21).









