नीति आयोगाच्या अहवालात नमूद : गरिबीत सुमारे 18 टक्क्यांची घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीति आयोगाच्या ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : एक प्रगती संबंधी समीक्षा’नुसार मागील 9 वर्षांमध्ये भारतात 24.82 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून (मल्टीडायमेंशनल पॉवर्टी) मुक्त झाले आहेत. या डाटाला एक विकसित देश होण्याच्या दिशेने भारताच्या प्रगतीचा प्रमुख संकेतांक म्हणून पाहिले जाऊ शकते.
नीति आयोगाच्या अहवालानुसार भारतात बहुआयामी गरिबीत उल्लेखनीय घट झाली आहे. 2013-14 मध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण 29.17 टक्के होते. 2022-23 मध्ये हे प्रमाण 11.28 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच 9 वर्षांमध्ये बहुआयामी गरिबीचे प्रमाण 17.89 टक्क्यांनी कमी झाले आहे.
उत्तर प्रदेशात मागील 9 वर्षांदरम्यान 5.94 कोटी लोक बहुआयामी गरिबीच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. उत्तर प्रदेशनंतर बिहारमधील 3.77 कोटी, मध्य प्रदेशातील 2.30 कोटी तर राजस्थानातील 1.87 कोटी लोक बहुआयामी गरिबीतून बाहेर पडले आहेत.