कुद्रेमनी येथील सत्कार समारंभात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर /कुद्रेमनी
कर्नाटक राज्य महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मीबाई हेब्बाळकर यांचा नागरी सत्कार कार्यक्रम शनिवारी कुद्रेमनी येथे पार पडला. गावातील काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य अरुण देवण होते. रवी पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी दीपक पाटील, सदस्य विनायक पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष वैजू राजगोळकर, कार्यकर्ते शंकर पाटील, रामलिंग पाटील, ता. पं. सदस्या शुभांगी राजगोळकर, काशिनाथ देवण, जोतिबा बडसकर, रुक्मणा कागणकर, संजय राजगोळकर, रामचंद्र पाटील, बाळाराम पाटील, लक्ष्मण राजगोळकर, रवळू देवण, नाना पाटील आदिंच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील महिला मंडळे, युवक मंडळे, वारकरी सांप्रदाय व परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार झाला.
सत्कारप्रसंगी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, राष्ट्र व समाज विकासासाठी महिलांचे आर्थिक सबलीकरण होणे महत्त्वाचे आहे. महिलांनी विविध शासकीय योजनांचा उपयोग करून घ्यावा. ज्या महिला योजनांपासून वंचित आहेत. त्यांनाही योजनांचा लाभ तातडीने होईल. गावात शेतकरी भवनाचे बांधकाम करणे, शालेय सुविधा, रस्ते, पाणी, गटारी आदी नागरी सुविधा पुरविण्याविषयीची ग्वाही दिली. पुढे बोलताना हेब्बाळकर यांनी हा ग्रामीण भाग बारामतीसारखा सुजलाम सुफलाम करण्याचे प्रयत्न आहेत. शेतीला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी किंवा तिलारी धरणाचे पाणी शेतकऱ्यांसाठी आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. युवराज कदम यांनी बेळगाव ग्रामीण भागात राबविलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. अरुण देवण यांनी गावकऱ्यांच्या सोयीसाठी गावाला रोज दोन जादा बस सोडण्याविषयी मागणी केली. गावात प्रवेश करताच मंत्री हेब्बाळकर यांनी गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर, चव्हाटा, हनुमान मंदिरातील देवांचे दर्शन घेतले. व्यासपीठावर तुरमुरी गावचे रघुनाथ खांडेकर, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, ग्रा. पं. सदस्या विमल साखरे, मारुती पाटील, नाईकवाडी, महिला कार्यकर्त्या, गुरुनाथ देवण आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.









