बिग बॅश लीगमध्ये खेळणार आपला शेवटचा सामना
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज शॉन मार्शने 2001 पासून सुरू झालेल्या आपल्या शानदार कारकिर्दीला अलविदा म्हणत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न डर्बीमध्ये रेनेगेड्सला विजय मिळवून देणारी नाबाद 64 धावांची खेळी केल्यानंतर ही घोषणा केली. 17 जानेवारी रोजी सिडनी थंडरविरुद्धचा सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल.
शॉन मार्शने आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय विक्रम केले आहेत. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. मार्शने आयपीएलच्या पहिल्यावहिल्या सीझनची (आयपीएल 2008) ऑरेंज कॅप जिंकली होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपल्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत या डावखुऱ्या फलंदाजाने 38 कसोटी, 73 वनडे आणि 15 टी 20 सामने खेळले. कसोटीत 2265 धावा वनडे सामन्यांमध्ये 2773 धावा केल्या. तर टी 20 मध्ये त्याच्या बॅटमधून 255 धावा निघाल्या. मार्शने कसोटीत 6 आणि एकदिवसीय सामन्यात 7 शतके झळकावली आहेत. तसेच आयपीएलमध्ये तो फक्त पंजाब किंग्जकडून खेळला आहे. त्याने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळला आणि पदार्पणाच्या मोसमातच ऑरेंज कॅप जिंकली.
2001 मध्ये स्थानिक क्रिकेटपासून सुरु झालेला मार्शचा प्रवास तब्बल 22 वर्षानंतर थांबणार आहे. स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मार्शचा प्रवास रोमांचकारी राहिला. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









