प्रतिनिधी/ बेळगाव
अथणी येथील वन्यजीवन छायाचित्रकार किरण कुलकर्णी यांच्या फोटोंचे प्रदर्शन सध्या वरेरकर नाट्या संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, वन्यजीवांचे संरक्षण करणे हे आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. या कामामध्ये हे प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांना वन्यजीवांविषयी माहिती देऊन त्यांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, हे यातून पटवून दिले जात आहे. यावेळी वनविभागाचे उपवन संरक्षणाधिकारी एस. के. कल्लोळीकर, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे विजय दरगशेट्टी यांनीही मार्गदर्शन केले.
वन्यजीव छायाचित्रकार किरण कुलकर्णी यांनी वन्यजीवांची छायाचित्रे टिपताना आलेल्या अनुभवांची माहिती दिली. कर्नाटकचे माजी अर्थमंत्री कै. एम. वाय. घोरपडे यांच्याकडून प्रेरणा घेऊन वन्यजीव छायाचित्रणाला सुरुवात केली. तसेच जगप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम यांनी छायाचित्रणासाठी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनामध्ये अनेक दुर्मीळ प्राण्यांची छायाचित्रे कुलकर्णी यांनी टिपली आहेत.
या प्रदर्शनात वन्यजीवांची एकूण 84 छायाचित्रे असून ही छायाचित्रे पाहणे हा एक अनोखा आनंदच आहे. बेळगावकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी व वन्यजीवन जाणून घ्यावे, असे आवाहन किरण कुलकर्णी यांनी केले आहे. सदर प्रदर्शन 14 जानेवारीपर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 7.30 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनातून मिळणारा निधी रोटरी क्लब साऊथच्या सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात येणार आहे.









