वृत्तसंस्था/ अल रेयान (कतार)
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात भारतीय फुटबॉल संघाला पहिल्याच लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये बलाढ्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय खेळाडूंनी आक्रमक चढायावर अधिक भर दिला होता तर त्यांनी आपली बचावफळी भक्कम राखल्याने ऑस्ट्रेलियाला पूर्वार्धात आपले खाते उघडता आले नव्हते. सामन्यातील 50 व्या मिनिटाला जॅक्सन इर्विनने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. 73 व्या मिनिटाला जॉर्डन ब्रॉसने ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल केला. भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता न आल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना एकतर्फी जिंकून पूर्ण गुण वसूल केले. आता या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा दुसरा सामना उझ्बेकिस्तानबरोबर 18 जानेवारीला खेळविला जाणार आहे.









