पश्चिम बंगालमधील घटनेचे संतप्त पडसाद : राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू
वृत्तसंस्था/ कोलकाता
उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर पश्चिम बंगालमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक लोकांनी अपहरणकर्ते समजत त्यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत साधूंना गर्दीतून वाचवत जवळच्या पोलीस ठाण्यात नेल्यामुळे ते बचावले. यासंबंधीचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या घटनेवरून आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधूंवर हल्ला होण्याची गुऊवारी ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील तीन साधू, एक व्यक्ती आणि त्याची दोन मुले मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करण्यासाठी गंगासागर येथे निघाली होती. यावेळी ते रस्ता चुकल्यावर त्यांनी काही मुलांकडे वाटेबाबत विचारणा केली. मात्र, मुलांना त्यांची भाषा न समजल्याने साधूंना पाहताच मुले ओरडत पळत सुटली. त्यानंतर स्थानिक लोकांनी साधूंना पकडून मारहाण करण्यास सुऊवात केली. प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात आणले. साधूंवर हल्ला करणाऱ्या 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. याशिवाय या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांच्या शोधासाठी छापे टाकण्यात येत आहेत.
तृणमूल सरकारवर भाजपची टीका
मारहाणीच्या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये संतप्त जमाव साधूंच्या वाहनाची तोडफोड करताना दिसत आहे. दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत या घटनेवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रातील पालघरसारखी लिंचिंगची घटना पश्चिम बंगालच्या पुऊलियामध्ये घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणे हा गुन्हा झाला आहे’, असे ट्विट भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केले आहे.









