तेरेखोल नदीत रेती उत्खननाला मान्यता द्या, सिंधुदुर्गातील रेती वैध असल्याचे कागदोपत्री सिद्ध करा : रेती व्यावसायिकांचे गोवा सरकारला आव्हान
पेडणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एका महिन्याच्या आत हा व्यवसाय सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले खरे, परंतु त्याच तेरेखोल नदीचा उल्लेख नसल्यामुळे अनेक जण संभ्रमात सापडलेले आहे. दुसऱ्या बाजूने मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार राणे आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जे महाराष्ट्रातून रेती ट्रक वाहतूक सुरू पूर्वी होते, त्याच पद्धतीने ते पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी केली. याला मुख्यमंत्री मान्यता दिली. स्थानिकांचा रेती व्यवसाय जोपर्यंत सुरू होत नाही. तोपर्यंत आम्ही बाहेरून येणाऱ्या रेती वाहतुकीला विरोध करणार, असा इशारा पेडणे रेती व्यावसायिकानी दिल्यामुळे भविष्यात रेती व्यावसायिक, सरकार राजकरते आणि ट्रक मालक यांच्यामध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
गोव्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही रेती उत्खननावर कडक बंधने आहेतमग महाराष्ट्र राज्यातून येणारी रेती कशी कायदेशीर आहे. हे प्रथम सरकाराने पेडणेकरांना कागदोपत्री दाखवून सिध्द करावे, असे आव्हान पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी केले. पेडण्यातील सर्व रेती व्यावसायिकांनी एकता दाखवित एकसंघ राहुन रेती व्यावसायिकांवरील अन्याया विरोधात साथ द्यावी. ज्या प्रकारे महाराष्ट्रातून रेतीव्यवसाय सुरू करण्यास सरकारने तत्परता दाखविली, तशीच तत्परता पेडणेतील रेती व्यावसायिकांबाबत दाखवावी, अशी मागणीही नाईक यांनी केली.
आम्ही असा कोणता गुन्हा केला? म्हणून आमचा रेती व्यवसाय सरकार सुरू करत नाही. आम्ही कायदेशीर रेती व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाने घेण्याची आमची तयारी आहे. पारंपरिक पद्धतीने पेडणे तालुक्यातील शापोरा तेरेखोल आणि राज्यातील इतर नद्यांमधून रेती उपसा करण्यास आम्हाला सरकारने मान्यता द्यावी. आमची पारंपरिक रेती व्यवसाय अगोदर सुरू करावा. त्यानंतरच परराज्यातून रेती व्यवसायिक वाहतूक सुरू करावी अन्यथा प्रत्येक नाक्यावरून होणारी रेती वाहतूक कोणत्याही परिस्थितीत रोखणार, असा इशारा पेडणेतील रेती व्यावसायिकांनी पत्रादेवी येथे दिला. पत्रादेवी चेक नाक्यावर मोठ्या संख्येने व्यावसायिक उपस्थित होते. त्यामध्ये पेडणे तालुक्यातील जे शापोरा तेरेखोल नदीमध्ये पारंपरिक पद्धतीने रेती व्यवसाय करतात. त्यांच्या समावेशाबरोबरच राज्यातील इतर नद्यांमध्ये जे पारंपरिक रेती व्यवसाय करत असतात तेही नागरिक सामील झाले होते. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखून रेती व्यवसाय मागच्या कित्येक दिवसापासून बंद ठेवला आहे. सरकारने पारंपारिक पद्धतीने रेती व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. अन्यथा महाराष्ट्रातून येणारी रेतीवाहू वाहने रोखणार, असा इशारा तोरसेचे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी दिला.
आम्ही रेती माफिया नव्हे!
आम्हाला सरकारनेच माफिया बनवले. आम्ही रेती माफिया नसून आम्ही सरकारला रॉयल्टी भरायला तयार आहोत. सरकारने रेती उत्खनन परवाना देऊन भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी यावेळी वळवईकर यांनी केली.









