महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ : आसनाअभांवी खाली बसण्याची वेळ
बेळगाव : जूनपासून महिलांचा शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. परिणामी बसस्थानकातही आसनांअभावी प्रवाशांना खाली बसण्याची वेळ आली आहे. आधीच शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बस वाहतूक अडचणीत आली आहे. त्यातच बसथांब्यावरही प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. काँग्रेस सरकारने राज्यातील महिलांसाठी शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास सुरू केला आहे. मात्र त्या तुलनेत बसेस कमी असल्याने प्रवाशांची हेळसांड होवू लागली आहे. महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने बस थांब्यावरही गर्दी होवू लागली आहे. परिणामी महिला प्रवाशी फलाट सोडून रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण होवू लागला आहे. तर विविध बस थांब्यावर आसनांअभावी प्रवाशांना रस्त्यावर बसण्याची वेळ आली आहे.
विविध मार्गावर बसेस धावू लागल्या आहेत. या बसमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. मोफत प्रवासांमुळे महिला परिवहनच्या बसलाच अधिक पसंती देऊ लागल्या आहेत. त्यामुळे बसमध्येही गर्दी होवू लागली आहे. शिवाय बस थांब्यावरही प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हा-तान्हात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये महिला प्रवाशांची गर्दी उसळू लागली आहे. मात्र बसवेळेत येत नसल्यामुळे प्रवाशी रस्त्यावरच ताटकळत थांबत असल्याचे दिसत आहे. प्रवाशांना आसने कमी पडत असल्याने फलाटावर खाली बसावे लागत आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना ये-जा करणे गैरसोयीचे होवू लागले आहे. महिलांचा केवळ आधारकार्डच्या आधारावर मोफत प्रवास सुरू झाला आहे. विविध ठिकाणी पर्यटनस्थळे आणि धार्मिक मंदिरांना भेटी देणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बस स्थानकातही पुरुषांपेक्षा महिला अधिक दिसू लागल्या आहेत. तर काहीवेळा बसमध्ये जागा मिळविण्यासाठी महिलांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडू लागले आहेत. त्यामुळे शक्ती योजना इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू लागली आहे. विविध ठिकाणी असणाऱ्या बस थांब्यावर महिला प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आसने कमी पडू लागली आहेत. परिणामी बसथांबा सोडून प्रवाशी रस्त्यावर येवू लागले आहेत.
जुन्या बसेस बंद पडण्याच्या प्रकारात वाढ : बस वाहतूक विस्कळीत : परिवहन उदासीन, प्रवाशांची गैरसोय
परिवहनच्या ताफ्यात आयुर्मान संपलेल्या जुन्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसेस रस्त्यावर नादुरुस्त होऊन बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. परिणामी प्रवाशांचीही मोठी गैरसोय होऊ लागली आहे. शुक्रवारी निपाणी आगारातील बेळगावहून निपाणीकडे जाणारी बस रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना इतर बसचा आधार घेऊन इच्छित स्थळी पोहोचावे लागले. अलीकडे परिवहनच्या बसेस रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. परिवहनकडे निधीची चणचण असल्याने नवीन बस खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे सद्य स्थितीत असलेल्या आणि आयुष्य संपलेल्या बसेसवर परिवहनचा गाडा सुरू आहेत. मात्र या बसेस प्रवासादरम्यान पंक्चर होणे, बंद पडणे, ब्रेक फेल होणे आणि इतर कारणांमुळे बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गतवर्षी परिवहनने बीएमटीसीकडून जुन्या बस खरेदी केल्या आहेत. या बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिवहनच्या तिजोरीत पैशाची चणचण असल्याने केवळ 1 लाख रुपयांत बीएमटीसीकडून जुन्या बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासादरम्यान या बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भर रस्त्यात बसेस बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत होवू लागली आहे. शक्ती योजनेपासून महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे बस वाहतुकीवरील अतिरिक्त प्रवाशांचा ताण वाढला आहे. यातच परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसेसची संख्या अधिक असल्याने बसवाहतूक त्रासदायक ठरू लागली आहे. याबाबत परिवहन मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे. अनियमित व अपुऱ्या बससेवेमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच परिवहनच्या ताफ्यात असलेल्या जुन्या बसेसच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे बस वाहतूक दिवसेंदिवस अडचणीची ठरू लागली आहे.









