वृत्तसंस्था/ पुणे
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामात येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या इलाईट अ गटातील सामन्यात कर्णधार विराट सिंगच्या शानदार शतकाच्या जोरावर झारखंडने यजमान महाराष्ट्राविरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 292 धावा जमविल्या.
या सामन्यात महाराष्ट्रने नाणेफेक जिंकून झारखंडला पहिली फलंदाजी दिली. सिद्धकी आणि देवव्रत यांनी सलामीच्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. सिद्धकीने 5 चौकारांसह 27 तर देवव्रतने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा जमविल्या. झारखंडचे हे पहिले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर कुमार सुरज आणि कर्णधार विराट सिंग यांनी झारखंडचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 145 धावांची भागिदारी केली. कुमार सुरजने 1 षटकार आणि 11 चौकारांसह 83 तर कर्णधार विराट सिंगने 3 षटकार आणि 8 चौकारांसह 108 धावा झळकाविल्या. दिवसअखेर कुशाग्र 5 चौकारांसह 32 धावांवर तर रॉय 2 धावावर खेळत आहे. महाराष्ट्रातर्फे हितेश वळुंजने 76 धावात 3 तर पालकरने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : झारखंड प. डाव 89 षटकात 5 बाद 292 (विराट सिंग 108, कुमार सुरज 83, देवव्रत 31, सिद्धकी 27, कुशाग्र खेळत आहे 32, वळुंज 3-76, पालकर 2-47).









