वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अॅथलिट तसेच भालाफेक धारक किशोर कुमार जेना त्याचप्रमाणे महिला वेटलिफ्टर मिराबाई चानू यांना ऑस्ट्रेलियात प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार असून या प्रशिक्षण योजनेला क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी जेना आणि मिराबाई चानू यांच्यासाठी विदेशात खास प्रशिक्षण योजना आखण्यात आली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक धारक किशोर कुमार जेनाने रौप्यपदक मिळवले होते. आता त्याला प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात पाठविले जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे जेनासाठी 78 दिवसांच्या कालावधीकरिता प्रशिक्षण योजना आखण्यात आली आहे. तर भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चानूला अमेरिकेतील सेंट लोयुस येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. या प्रशिक्षणावेळी मिराबाई चानूसमवेत प्रमुख प्रशिक्षक विजय शर्मा राहणार आहेत. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम (टॉप्स)योजनेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या निधीतून जेना आणि मिराबाई चानू यांच्या प्रशिक्षणासाठी आर्थिक खर्च शासनाकडून केला, जाईल असे क्रीडा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.









