भारतीय महिला हॉकी संघ सरावावेळी
वृत्तसंस्था/ रांची
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे प्रमुख लक्ष राहिल. येथे शनिवारपासून आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या ऑलिम्पिक पात्रता महिला हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यजमान भारताचा सलामीचा सामना अमेरिकेबरोबर खेळवला जाणार आहे.
या ऑलिम्पिक पात्रता महिलांच्या हॉकी स्पर्धेत यजमान भारत, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, इटली, जपान, अमेरिका, चिली आणि न्यूझीलंड असे आठ संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील आघाडीचे तीन संघ पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेत जर्मनीचा संघ हा मानांकनातील सर्वोच्च म्हणजे पाचव्या स्थानावर आहे. हॉकी फेडरेशनच्या मानांकनात भारत सहाव्या, न्यूझीलंड सातव्या, जपान 11 व्या, चिली 14 व्या, अमेरिका 15 व्या इटली 19 व्या आणि झेक प्रजासत्ताक 25 व्या स्थानावर आहेत.
या स्पर्धेमध्ये भारताचा ब गटात समावेश असून न्यूझीलंड, इटली आणि अमेरिका यांचाही यामध्ये सहभाग आहे. अ गटात जर्मनी, माजी आशियाई विजेते, जपान, चिली आणि झेक प्रजासत्ताक यांचा समावेश आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात शनिवारी सलामीचा सामना होणार आहे. त्यानंतर भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना 14 जानेवारीला, तिसरा सामना 16 जानेवारीला इटलीबरोबर होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 18 जानेवारीला तर अंतिम सामना 19 जानेवारीला खेळविला जाईल. आधुनिक हॉकी युगामध्ये मानांकनाला विशेष महत्त्व दिले जात नाही. 1983 नंतर भारत आणि अमेरिका महिला संघामध्ये पहिल्यांदाच लढत होत आहे. परस्परामध्ये आतापर्यंत 15 सामने झाले असून त्यापैकी अमेरिकेने 9 वेळा तर भारताने 4 वेळा विजय नोंदवले असून दोन सामने बरोबरीत राहिले आहेत. भारतीय संघातील अनुभवी आणि ज्येष्ठ हॉकीपटू वंदना कटारियाने आतापर्यंत 300 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले असले तरी ती शनिवारच्या सामन्यात उपलब्ध राहणार नाही. भारतीय संघाच्या आघाडीफळीत तिच्या स्थानी बलजित कौरला संधी देण्यात आली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये गेल्या दशकामध्ये वंदना कटारियाने भारतीय संघाचे सातत्याने प्रतिनिधीत्व केले असून तिने यापूर्वी रिओ आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता. उन्हाळी क्रीडा स्पर्धेत हॅट्ट्रिक नोंदवणारी वंदना कटारिया ही पहिली भारतीय महिला हॉकीपटू आहे. शनिवारच्या सामन्यात भारतीय संघाला वंदना कटारियाची उणीव चांगलीच भासेल. तिच्या गैरहजरीत आघाडीफळीची जबाबदारी लालरीसियामी, संगीता कुमारी, दीपिका आणि बलजित कौर यांच्यावर राहिल. बचावफळीत निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी आणि मोनिका यांचा समावेश राहिल. मध्यफळीची जबाबदारी प्रामुख्याने निशा, वैष्णवी फाळके, नेहा, नवनीत कौर, सलिमा टेटे, सोनिका, ज्योती आणि ब्युटी डुंगडुंग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत शनिवारी भारत आणि अमेरिका तसेच जर्मनी आणि चिली, जपान आणि झेक प्रजासत्ताक, न्यूझीलंड आणि इटली यांच्यात सामने होतील.









