सुशोभिकरण करण्याची सुळगा (ये.) ग्रामस्थांची मागणी : विषारी प्राण्यांमुळे भीतीचे वातावरण
वार्ताहर /धामणे
सुळगा (येळ्ळूर) गावच्या प्रवेशद्वारासी असलेल्या भावकेश्वरी तलावाचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. सुळगा गाव राजहंसगडाच्या पायथ्याशी असून गावच्या प्रवेशद्वारी भावकेश्वरी तलाव असून तलावाच्या दोन्ही बाजूनी रस्ते आहेत. सध्या या तलावाच्या सभोवताली काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तेथे विषारी प्राणी असण्याची शक्यता असल्याने भीती निर्माण झाली असल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात आले. कारण या तलावाच्या शेजारीच दोन माध्यमिक विद्यालये आहेत. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ जास्त आहे. त्याचप्रमाणे या तलावाच्या बाजूने येळ्ळूर, राजहंसगड, देसूरला जाणारा रस्ता असल्याने येथेच बसथांबा आहे. त्यामुळे प्रवासीसुद्धा या तलावाच्या शेजारी थांबून असतात.
गावानेच केली होती खोदाई
पाण्याचे एकर क्षेत्रफळ असलेल्या तलावाची खोदाई गेल्या चार वर्षापूर्वी स्वखर्चाने गावकऱ्यांनीच केली असल्याचे माजी ग्रा. पंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांनी सांगितले. शासनातर्फे तालुक्यातील अनेक तलावांची खोदाई करून सुशोभिकरण केले आहे. आम्ही गावकऱ्यांचावतीने आमच्या गावातील भावकेश्वरी तलावाचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी आमच्या भागाचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही या तलावाचे सुशोभिकरण करण्याचे टाळत असल्याचे येथील नागरिकांच्याकडून सांगण्यात आले.
सध्या मेपर्यंत पाणीसाठा
पूर्वी या तलावाचे डिसेंबर महिन्यापूर्वीच पाणी आटत होते. परंतु गावकऱ्यांनी तलावाची खोदाई केल्यापासून आता मे महिन्यापर्यंत या तलावात पाणी साचून राहत असल्याने गावातील कूपनलिका आणि विहिरांना पाणी राहत आहे.
आतातरी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
निदान आता तरी या भागाच्या लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर सुशोभिकरण करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या या सुळगा गावची शोभा वाढवून या गावच्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.









