अध्याय तिसावा
नाथमहाराज म्हणाले, श्रीकृष्णाने यादव वंशियांच्याबरोबर स्वत:च्या शरीराचा त्याग केला. ह्या घटनेचा सविस्तर वृत्तांत शुकमुनी परिक्षित राजाला सांगू लागले. ते म्हणाले, ब्रह्मज्ञानी उद्धवाला ब्राह्मणांचा शाप बाधू नये म्हणून भगवंतांनी त्याला बद्रीकाश्रमात पाठवून दिले. तो निघून गेल्यावर द्वारकेवर अनेक विघ्ने चालून येऊ लागली. तिन्ही प्रकारचे उत्पात होऊ लागले. आकाशात दंडकेतु, धूमकेतु, शिखाकेतु दिसू लागले. धरणीकंप होऊन मोठमोठे आवाज होऊन नगरात भूस्फोट होऊ लागले. त्यामुळे सर्व घरे डळमळू लागली. सोसाट्याचा वारा सुटला. झाडे समूळ उखडली जाऊ लागली. द्वारकेत धुळीचे लोटच्या लोट उठू लागले. अकस्मात आभाळातून रक्त वर्षाव होऊ लागला तर क्षणात ते निरभ्र होऊ लागले. सूर्य आणि चंद्राला अखंड खळे पडू लागले. अधूनमधून विजांचा कडकडाट होऊ लागला. राजवाड्यात कुत्री ओरडू लागली. दरबारातील सभागृहे ओस पडू लागली. दु:खसूचक अरिष्टे ओढवू लागली. हे सर्व बघून थोरथोर यादववीर त्याबद्दल विचारविनिमय करू लागले. ते एकमेकांना म्हणू लागले की, द्वारकेचे विघ्ननिर्दळण करण्यासाठी श्रीकृष्णाचे सुदर्शन सज्ज असताना ही विघ्ने ओढवायचे काय कारण आहे? नुसतं गवताचे एक पाते जरी दुसऱ्या पात्याला चिकटले तरी हे सुदर्शन चक्र एकवीसवेळा फिरते. असे असताना द्वारकेवर विघ्ने आली ही आश्चर्याची गोष्ट आहे. श्रीकृष्ण स्वत: येथे हजर असताना असे उत्पात उठायचे कारणच काय हे त्यांना उमगेना.
अशा चिंतातूर होऊन विचारमग्न झालेल्या यादवांना काही सांगावे असे कृष्णाच्या मनात आले. अखिल जगाची सूत्रे हलवणाऱ्या आणि मायेवर नियंत्रण ठेवणाऱ्या श्रीकृष्णाच्या लक्षात आले की, यादवांचा अंत आता जवळ आला आहे. त्याने विचार केला की, द्वारका ही सातवी मोक्षपुरी असल्याने पुण्यक्षेत्र आहे. ह्यांचा येथे अंत झाला तर ह्यांना मोक्ष मिळेल परंतु ह्यांची कृत्ये बघितल्यावर ह्यांच्या पापांचे परिमार्जन झाल्याशिवाय ह्यांना मोक्ष मिळणे हे कर्मसिद्धांताच्या विरुद्ध होईल. तेव्हा ह्यांना येथून बाहेर काढले पाहिजे. म्हणून ते त्यांना म्हणाले, आपल्या कुळाला ब्राह्मणांचा शाप आहे हे तुम्हाला माहित आहेच. त्या शापानुसार आपले समस्त कुल नष्ट होणार आहे. त्याचीच खुण म्हणून द्वारकेवर नाना विघ्ने येऊन अनेक उत्पात घडत आहेत. त्यामुळे सोन्याची द्वारकानगरी नष्ट होण्याची शक्यता आहे.
आता जर आपण येथे राहिलो तर घोर संकटात सापडून दु:खी होऊ. त्यावर काही उपाय म्हणून येथे क्षणभरसुद्धा न राहता आपण सर्वजण प्रभास ह्या क्षेत्री जाऊ. तेथे काही धार्मिक कार्ये करून आपल्या शापाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू. यादवांच्यामध्ये उदभट म्हणून एक शूर यादववीर होते. ते अत्यंत गर्विष्ठ होते. ते म्हणाले, आमचे अरिष्ट काय वाकडे करू शकणार? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, ब्राह्मणाच्या शापाच्या ताकदीपुढे तुमचे शौर्य काय कामाचे? हट्टाने ह्या द्वारकेत रहाल तर अत्यंत कष्टी व्हाल. तेव्हा कोणताही मागला पुढला विचार न करता स्त्रिया, पुत्र, नातेवाईक ह्या सगळ्यांच्यासह ताबडतोब निघायला हवं. द्वारकेमध्ये आता कुणी पाणीसुद्धा पिऊ नका. समस्त यादवकुळाला शाप मिळालेला पाहून ही द्वारकानगरी संतापलेली आहे. तेव्हा हे कुळाचे पाप नष्ट करण्यासाठी प्रभास ह्या क्षेत्री जाऊ हे श्रीकृष्णाचे सांगणे सगळ्यांना पटले आणि ते प्रभास ह्या क्षेत्री जाण्यास तयार झाले. ह्यावरून लक्षात येते की, मनुष्य एकदा मस्तवाल झाला की, तो त्याला मिळालेली सर्व बुद्धी घालवून बसतो. येथे यादवांचे असेच झाले. त्यांनी श्रीकृष्णाचे अनेक चमत्कार बघितले होते तरीही त्याच्यातले देवत्व त्यांना दिसले नाही. ही द्वारका ही मोक्षपुरी आहे हेही ते विसरले आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रभास क्षेत्री जाण्यास तयार झाले.
क्रमश: