मलेशियन ओपन बॅडमिंटन : एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत गारद
वृत्तसंस्था/ क्वालालम्पूर
येथे सुरु असलेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील अव्वल जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी विजयी प्रारंभ करताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत मात्र युवा खेळाडू लक्ष्य सेन व एचएस प्रणॉय यांना मात्र पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यात या स्पर्धेत दुसरे मानांकन मिळालेल्या सात्विक व चिराग जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद फिकरी-मौलाना बगास या जोडीचा 21-18, 21-19 असा पराभव केला. 44 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय जोडीने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले. सात्विक व चिरागने पहिल्या गेममध्ये 8-4 अशी आघाडी घेतली होती. आपला आक्रमकपणा कायम ठेवत भारतीय जोडीने आपली आघाडी 17-12 अशी केली. प्रतिस्पर्धी इंडोनशियन जोडीने काही गुणाची कमाई केली खरी पण भारतीय जोडीने नेटजवळ सरस खेळ करत हा गेम 21-18 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही जोडीत एकेका गुणासाठी चांगलाच संघर्ष पहायला मिळाला. एकवेळ दोन्ही जोडीमध्ये 18-18, 19-19 अशी बरोबरी होती. पण मोक्याच्या क्षणी सात्विक व चिरागने खेळ उंचावत हा गेम 21-19 असा जिंकला व पुढील फेरीतील स्थान निश्चित केले. आता, पुढील फेरीत त्यांची लढत फ्रान्सच्या लुकास कोर्वी व रोनान लेबर या जोडीशी होईल.
लक्ष्य सेन, प्रणॉयचे पॅकअप
पुरुष एकेरीत मात्र युवा खेळाडू लक्ष्य सेन व एचएस प्रणॉय यांना मात्र पहिल्याच फेरीत हार पत्कारावी लागली. बुधवारी झालेल्या सलामीच्या लढतीत प्रणॉयला डेन्मार्कच्या अँडर्स अॅटन्सनने 21-14, 21-11 असे नमवले. 43 मिनिटे चाललेल्या या लढतीत प्रणॉयने अनेक चुक केल्या, याचा फायदा प्रतिस्पर्धी अँडर्सने घेत पुढील फेरी गाठली. याशिवाय, अन्य एका लढतीत लक्ष्य सेनला चीनच्या 18 व्या मानांकित होंग यांग वेंगने 21-15, 21-15 असे पराभूत केले. लक्ष्य सेन व प्रणॉयच्या पराभवानंतर पुरुष एकेरीत भारताच्या आशा किदाम्बी श्रीकांतवर असणार आहेत.









