वृत्तसंस्था/ जकार्ता
नवोदित नेमबाज नॅन्सी व ऑलिम्पियन इलावेनिल वलरिवन यांनी येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धत महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात सुवर्ण व रौप्यपदक पटकावले.
किशोरवयीन नॅन्सीने अंतिम फेरीत 252.8 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले. अंतिम फेरीसाठी एकूण आठ खेळाडू पात्र ठरल्या होत्या. तिचीच देशवासी इलावेनिल वलरिवनचे सुवर्ण मात्र अगदी किंचित फरकाने हुकले. तिने 252.7 गुण नोंदवले. या प्रकारात क्लीन स्वीप साधण्याची भारताची संधीही थोडक्यात हुकली. मेहुली घोषने 210 गुण मिळवित चैथे स्थान घेतले तर चीनच्या शेन युफानने कांस्यपदक मिळविले. नॅन्सीने अंतिम फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करताना एकदाही कमी गुणांचा वेध घेतला नाही तर इलावेनिलने दहाव्या शॉटमध्ये 9.7 गुण नोंदवले. या गुणामुळेच तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. पात्रता फेरीत मात्र इलावेनिलने 633.8 गुण घेत अव्वल स्थान घेतले होते तर नॅन्सीने 632.4 व मेहुली घोषने 631.0 गुण मिळविले होते.
पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या रुद्रांक्ष पाटीलला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने अंतिम फेरीत 228.7 गुण नोंदवले. या प्रकारात चीनच्या मा सिहानने 251.4 गुणांसह सुवर्ण व कोरियाच्या दाएहान चो याने रौप्यपदक पटकावले. आणखी एक भारतीय नेमबाज अर्जुन बबुताने सहावे स्थान मिळविले. पात्रता फेरीत रुद्रांक्षने 630.4 गुण घेत तिसरे मिळवित अंतिम फेरी गाठली होती तर बबुताने पात्रता फेरीत 629.6 गुण घेत चौथे स्थान घेतले होते.









