प्राध्यापकाचा हात कापणाऱ्या मुख्य आरोपीला अटक, 13 वर्षांपासून होता फरार : अटकेवर होते 10 लाखांचे बक्षीस
कन्नूर :
केरळमधील प्राध्यापक जोसेफ यांचा हात कापल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयनेने बुधवारी या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सावेद याला अटक केली आहे. तपास यंत्रणेने आरोपीवर 10 लाख ऊपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तो गेल्या 13 वर्षांपासून फरार होता. दशकाहून अधिक काळानंतर एनआयएने केरळमधील कन्नूरमधील मत्तनूर भागातून आरोपीला अटक केली.
आरोपी सावेदवर 2010 मध्ये प्राध्यापक टी. जे. जोसेफ यांचा तळहात कापून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 13 वर्षे जुन्या या प्रकरणात एनआयएने सावेदवर खुनाच्या प्रयत्नासह अनेक गंभीर कलमांखाली आरोप दाखल केले आहेत. या प्रकरणातील आरोपपत्र 10 जानेवारी 2011 रोजी दाखल करण्यात आले होते.









