अध्याय तिसावा
नाथमहाराज म्हणतात, जे भक्तिभावाने श्रीकृष्णकीर्ती ऐकतात ते असंत असले तरी संत होतात. ज्या महाकवींनी श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन केले त्यांना परम सौभाग्यस्थिती प्राप्त झाली. अशी ही श्रीकृष्णकीर्ती अगाध असून त्यांची मूर्ती जे अखंड ध्यानात ठेवतील ते कृष्णरूप होतील. जे त्याचा द्वेष करायचे तेही द्वेषाने किंवा त्याच्यापासून आपल्याला भय आहे ह्या कल्पनेने सदैव त्याचे ध्यान करायचे. त्यामुळे तेही कृष्णरूप होऊन मुक्त झाले. महाभारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य मेघश्याम श्रीकृष्णाने केले. त्यामुळे अर्जुनाचा विजय झाला. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करत असताना संपूर्ण युद्धभूमीवर त्याचा रथ ते फिरवत होते. त्यावेळी ज्या ज्या योद्ध्यांना मृत्यूसमयी श्रीकृष्णाचे दर्शन झाले ते ते सर्व कृष्णरूप झाले. जेथे जेथे श्रीकृष्णाची पावले पडत होती तेथे तेथे चारही मुक्तींचा वावर होत होता. अशी तनु श्रीकृष्णाने कशी त्यागली असेल? का ब्रह्मशापाला भिऊन त्याने आपणहूनच आत्मघात करून घेतला असेल अशी शंका निर्माण होते. श्रीकृष्णाचा जन्म यादव वंशात झाला होता आणि ब्राह्मणांचा शाप समस्त यादव वंशाला लागू होता. त्यानुसार श्रीकृष्णासह सर्व यादव कुळातील लोकांचा नाश होणे अपेक्षित होते. तसे झाले तरच ब्राह्मणांचा शाप सत्य झाला असता. तसं बघितलं तर श्रीकृष्ण परिपूर्ण परब्रह्म होता. त्यामुळे त्याला शापाचे बंधन लागू नव्हते. तरीपण ब्रह्मवचन सत्य करण्यासाठी त्याने यादव वंशियांच्याबरोबर स्वत:च्या शरीराचा त्याग केला. ह्या घटनेचा सविस्तर वृत्तांत सांगा अशी राजा परिक्षीताने योगीराज शुक मुनींना विनंती केली. पांडव कुळातील एकमेव कुलदीपक असलेल्या राजा परिक्षिताला भागवताचा उपदेश ऐकायचे भाग्य लाभले होते. आत्तापर्यंत ब्रह्मदेव, नारद, व्यास ह्यांच्यापर्यंत मर्यादित राहिलेला असल्याने भागवताचा उपदेश गुप्त होता परंतु परिक्षित राजाने तो सर्व लोकांच्या उद्धारासाठी प्रकट केला. धर्मवंशात जन्मलेला आणि अतिधार्मिक असलेला राजा परीक्षित भागवताचे श्रवण अतिरसिकतेने आणि अत्यंत तन्मयतेने करत होता. अशा परिक्षित राजाने अत्यंत आदराने केलेली विनंती ऐकून शुकमुनींचे चित्त सुखावले. सहाजिकच आहे ऐकणारा मनापासून ऐकतो आहे म्हंटल्यावर सांगणाऱ्याचा उत्साह द्विगुणीत होतो. पुढील कथाभाग शुकमुनी उत्साहाने सांगू लागले. ते म्हणाले, ब्रह्मज्ञानी उद्धवाला ब्राह्मणांचा शाप बाधू नये म्हणून भगवंतांनी त्याला बळेबळेच बद्रीकाश्रमात पाठवून दिले. तो निघून गेल्यावर द्वारकेवर अनेक विघ्ने चालून येऊ लागली. तिन्ही प्रकारचे उत्पात होऊ लागले. दिवसा उल्कापात होत होते. आकाशात दंडकेतु, धूमकेतु, शिखाकेतु दिसू लागले. असे अति अद्भुतु दृश्य दिवसाही दिसायला लागले. धरणीकंप होऊन मोठमोठे आवाज होऊन नगरात भूस्फोट होऊ लागले. त्यामुळे सर्व घरे डळमळू लागली. सोसाट्याचा वारा सुटला. झाडे समूळ उखडली जाऊ लागली. द्वारकेत धुळीचे लोटच्या लोट उठू लागले. त्याचे प्रमाण एव्हढ्या मोठ्या प्रमाणात होते की नगरजनांना डोळे उघडणे अशक्य झाले. अकस्मात आभाळातून रक्त वर्षाव होऊ लागला तर क्षणात ते निरभ्र होऊ लागले. सूर्य आणि चंद्राला अखंड खळे पडू लागले. दुष्ट ग्रहांची युती होऊ लागली. अधूनमधून विजांचा कडकडाट होऊ लागला. जेवत असलेल्या प्रजाजनांच्या ताटातील अन्न घारी झडप घालून पळवू लागल्या. राजवाड्यात कुत्री ओरडू लागली. दरबारातील सभागृहे ओस पडू लागली. दु:खसूचक अरिष्टे ओढवू लागली. हे सर्व बघून थोरथोर यादववीर त्याबद्दल विचाविनिमय करू लागले. ते एकमेकांना म्हणू लागले की, द्वारकेचे विघ्ननिर्दळण करण्यासाठी श्रीकृष्णाचे सुदर्शन सज्ज असताना ही विघ्ने उठायचे काय कारण आहे?
क्रमश:








