अन्याय त्वरित थांबवा, अन्यथा आंदोलनाचा श्रीराम सेनेचा इशारा
बेळगाव : राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. सहा महिन्यांपासून अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्रास देण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. राज्य सरकारने असे प्रकार त्वरित थांबवावेत, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारचे हे कृत्य अशोभनीय आहे. सरकारने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात घेतलेली भूमिका त्वरित मागे घेण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
दो•बळ्ळापूर येथे बेकायदेशीररित्या 35 टन गोमांसाची होणारी बेकायदा वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. यावरून ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेशगौड यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना 48 दिवस कारागृहात ठेवले होते. श्रीराम सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा, चिक्कमंगळूर जिल्ह्यामध्ये प्रवेश निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रकरणी हुबळी येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम सेना राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांना चिक्कमंगळूर जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तसेच राजीव खान्नाप्पण्णावर, रणजीत शेट्टी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. मंगळूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तडीपार करण्यात आले आहे. तर गुलबर्गा येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा रावडीशिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असुन सरकारने आपले धोरण त्वरीत बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









