आमदार विठ्ठल हलगेकर : ‘लोकमान्य’-संगीत कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन
खानापूर : भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माला अत्यंत महत्त्व आहे. अध्यात्मात नवविधा भक्तीचे वर्णन संतमहात्म्यानी फार वेगळ्dया पद्धतीने केले आहे. नवविधा भक्तीत श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ मानली आहे. श्रवण भक्तीत देवाचे गुणगान ऐकणारा आणि गाणारा दोघेही मंत्रमुग्ध होऊन भक्तीधारेत चिंब होऊन जातात. आत्म्याशी एकरुपता साधली जाते. ही श्रवण भक्ती हजारो वर्षांपासून भारतात चालत आली आहे. या भक्तीतील कीर्तन आणि भजन सेवा सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. आज भजन सेवेच्या माध्यमातून ही कला जपली गेली आहे. त्या परंपरेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी अशा स्पर्धा होणे आवश्यक आहे, असे मत खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील लोकमान्य आणि संगीत कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भजन स्पर्धेत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर होते.
यावेळी मष्णू चोर्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती आणि वाद्यपूजन करण्यात आले. अध्यक्षपदावरून बोलताना धामणेकर म्हणाले, तालुक्यातील लोककला जपण्यासाठी लोकमान्यच्यावतीने भविष्यात कलाकारांना तसेच त्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हा आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आमदार विठ्ठल हलगेकर यांचा लोककला मंच व लोकमान्य संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. लोकमान्य संस्थेचे व्यवस्थापक विनायक जाधव, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष संजय कुबल, विलास बेळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गोपाळ पाटील, अमृत शेलार, निरंजन सरदेसाई, राजू सिद्धाणी, डी. बी. भोसले, के. पी. पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापिका शरयू कदम यांनी आभार मानले. सुरुवातीला लहान गटातील स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रथम क्रमांक मराठा मंडळ हायस्कूल खानापूर, द्वितीय क्रमांक महात्मा गांधी हायस्कूल नंदगड, तृतीय मराठा मंडळ हायस्कूल कान्सुली, चौथा मलप्रभा हायस्कूल चापगाव, पाचवा मराठा मंडळ हायस्कूल कुप्पटगिरी, सहावा माउली हायस्कूल गर्लगुंजी या संघांनी विजय मिळविला.









