वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाने नेदरलँड्सच्या हर्मन व्रुइस यांची हाय परफॉर्मन्स संचालकपदी नियुक्ती केल्याचे मंगळवारी जाहीर केले. येत्या सप्टेंबरपर्यंत ते या पदावर राहतील.
हॉकी इंडियाचे कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय हॉकी कार्यक्रमांवर देखरेख ठेवतील. त्यात प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचाही समावेश असल्यचे हॉकी इंडियाने पत्रकाद्वारे सांगितले. हर्मन यांना प्रशिक्षकपदाचा दोन दशकांचा अनुभव असून यापूर्वी भारताच्या पुरुष व कनिष्ठ महिला संघाच्या कनिष्ठ वर्ल्ड कपच्या तयारीची देखरेख केली होती. नेदरलँड्सबाहेरील डेन बॉश लेडीज क्लबचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या संघाने युरोपिय कप सलग आठ वेळा जिंकला आहे. याशिवाय नेदरलँड्स इनडोअर महिला हॉकी संघाचे ते 2006 ते 2008 या कालावधीत प्रमुख प्रशिक्षकही होते. अगदी अलीकडे त्यांनी बेलारुसच्या इनडोअर व आऊटडोअर संघांचे 2016 ते 2023 पर्यंत मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.









