वृत्तसंस्था/ म्युनीच
जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या फुटबॉल संघाने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर वेगळाच ठसा निर्माण केला होता. जर्मनीच्या फुटबॉल संघातील माजी फुटबॉलपटू फ्रांझ बेकनबॉयर यांचे रविवारी वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. सदर वृत्त जर्मनीच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. बेकेनबॉर यांनी जर्मनीला खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमीका वटवत फिफाचा विश्वकरंडक मिळवून दिला होता.
बेकेनबॉर यांनी जर्मनीतील बायर्न म्युनीच फुटबॉल क्लबचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले होते. जर्मनीच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये बेकनबॉयर आणि थॉमस मथायस हे महान फुटबॉलपटू म्हणून आजही गणले जातात. 1974 साली झालेल्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या पश्चिम जर्मनी फुटबॉल संघाचे नेतृत्व बेकनबॉयर यांनी केले होते. 1990 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या पश्चिम जर्मनी संघाचे बेकनबॉयर हे प्रमुख प्रशिक्षक होते. दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे जागतिक दर्जाचे फुटबॉलपटू मारियो झागालो यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. झगालो यांनी ब्राझीलला विश्व फुटबॉल करंडक मिळवून देताना प्रशिक्षक आणि खेळाडू अशी दुहेरी भुमीका बजावली होती. जागतिक फुटबॉल क्षेत्रात खेळाडू आणि प्रशिक्षक या नात्याने आपल्या देशाला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकून देणारे बेकनबॉयर हे दुसरे फुटबॉलपटू आहेत. बेकेनबॉर यांनी आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत 1974 ते 76 या कालावधीत सलग 3 वेळेला बायर्न म्युनीच फुटबॉल क्लबला युरोपीयन चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले होते. 1966 साली बेकनबॉयर यांनी पहिल्यांदाच विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पश्चिम जर्मनीचे प्रतिनिधित्व केले होते. आणि पश्चिम जर्मनीला अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. 1974 साली झालेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जर्मनीला उपांत्य फेरीत इटलीकडून हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेवेळी बेकनबॉयरला दुखापत झाली होती. 1977 साली बेकनबॉयर बायर्न म्युनीचला निरोप देत न्यूयॉर्कला रवाना झाले. बेकनबॉयर यांना 1978 ची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा हुकली होती. दरम्यान 1980 मध्ये बेकनबॉयर यांचे जर्मनीत पुनरागमन झाले होते.









