वृत्तसंस्था/ मुंबई
10 व्या प्रो-कबड्डी लिग हंगामातील येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बेंगळूर बुल्सने आतापर्यंत 3 वेळेला या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱ्या पाटणा पायरेट्सवर 34-33 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने थरारक विजय मिळविला.
या सामन्यात बेंगळूर बुल्स संघातील अनुभवी सुरजित सिंगने 8 टॅकल गुण मिळविले. तर पाटणा पायरेट्सचा कर्णधार निरजकुमारने 5 टॅकल गुण पटकाविले. या सामन्यात बेंगळूर बुल्सचा आघाडीचा चढाईपटू भरत याची उणीव संघाला चांगलीच भासली. बेंगळूर बुल्सच्या बचावफळीची जबाबदारी कर्णधार सौरभ नंदलाल आणि सुरजित यांच्यावर होती. 14 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सचे पहिल्यांदा सर्व गडी बाद करुन 16-8 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 20-12 अशी आघाडी घेतली होती. 27 व्या मिनिटाला पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 24-14 अशा 10 गुणांची भक्कम आघाडी मिळविली होती. पाटणा पायरेट्सचा हुकमी रायडर सचिनने आपल्या चढाईवर 3 गुण आपल्या संघाला मिळवून दिले. सामन्यातील 3 मिनिटे बाकी असताना बेंगळूर बुल्स संघ 8 गुणांनी पिछाडीवर होता. शेवटच्या 5 मिनिटांच्या कालावधीत पाटणा पायरेट्सने महत्त्वाचे काही गुण वसुल केले. दरम्यान बेंगळूर बुल्सने सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सचे सर्व गडी बाद करत 3 गुण वसुल केले. त्यामुळे या सामन्याअखेर बेंगळूर बुल्सने पाटणा पायरेट्सवर केवळ एका गुणाने विजय मिळविला.









