वृत्तसंस्था/ जकार्ता
भारताचे नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांनी येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरीच्या नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले. या जोडीने अंतिम फेरीत चीनच्या युफेन आणि मिंगशुई यांचा पराभव केला.
10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारातील अंतिम लढतीत रुद्रांक्ष आणि मेहुली यांनी चीनच्या शेन युफेन आणि झु मिंगशुई यांचा 16-10 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांनी आपली मक्तेदारी राखली. भारताच्या अर्जुन चीमा आणि रिदम सांगवान यांनी रौप्यपदक तर व्हिएतनामच्या ट्रिन आणि फेम यांनी कांस्यपदक मिळविले. अर्जुन चिमा आणि रिदम सांगवान यांनी ही लढत 17-11 अशी जिंकली. रिदम आणि अर्जुन यांनी पात्र फेरीमध्ये एकूण 582 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले होते. व्हिएतनामच्या ट्रिन आणि फेम यांनी 580 गुणांसह दुसरे स्थान घेतले.
10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भारताच्या रुदांक्ष आणि मेहुली यांनी पात्र फेरीत 631.3 गुणांसह दुसरे स्थान मिळविले होते. तर चीनच्या युफेन आणि मिंगशुई यांनी अग्रस्थान पटकाविले होते. भारताने कनिष्ठ गटात 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले. भारताच्या ईषा टाकसाळे आणि उमामहेश मॅडेनिनी यांनी चीनच्या झीक्विंग व बोवेन यांचा 17-11 असा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या अभिनव शॉ आणि अन्वि राठोड यांनी कांस्यपदक घेतले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारताने एकूण 10 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सोमवारी भारताचे वरुण तोमर आणि ईषा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदके मिळवून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट आरक्षित केले आहे.









