अतिरिक्त उपमुख्यमंत्री नेमण्याची मंत्र्यांची मागणी : शिवकुमारांकडून राजीनाम्याचा इशारा : काँग्रेसश्रेष्ठींसमोर पेच
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात तीन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणूक तयारीच्या निमित्ताने राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य दौऱ्यावर आलेले राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारपासून बेंगळूरमध्ये ठाण मांडले आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी तीन उपमुख्यमंत्री नेमण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली आहे. मात्र, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अतिरिक्त उपमुख्यमंत्री निर्माण केल्यास मी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन, असा स्पष्ट संदेश वरिष्ठांना रवाना केला आहे. त्यामुळे तीन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तप्त होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन नवे उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करावीत, अशी मागणी मंत्री सतीश जारकीहोळी, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, मंत्री के. एन. राजण्णा, डॉ. एच. सी. महादेवप्पा, दिनेश गुंडूराव, के. एच. मुनियप्पा, एम. बी. पाटील व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी यांनी केली आहे. या नेत्यांनी सोमवारी रात्री रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन मागणी पुढे ठेवली. मात्र, शिवकुमार यांनी नवी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यास तीव्र आक्षेप घेतला आहे.
सोमवारी रात्री काही मंत्र्यांनी सुरजेवाला यांची भेट घेऊन आणखी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यासाठी दबाव आणल्याचे समजताच डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांना फोन करून नवी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यास आपला विरोध असल्याचे सांगितले. जर नवी उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केल्यास मंत्रिमंडळातून बाहेर पडून केवळ प्रदेशाध्यक्षपद सांभाळेन, अशी भूमिका मांडल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची ही भूमिका काँग्रेसश्रेष्ठींची डोकेदुखी बनली आहे. एकीकडे तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यासाठी मंत्र्यांकडून दबाव तर दुसरीकडे शिवकुमारांचा विरोध अशा कोंडीत काँग्रेस हायकमांड सापडले आहे. त्यामुळे कोणता निर्णय घ्यावा, अशी द्विधा मन:स्थिती काँग्रेसश्रेष्ठींची झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन उपमुख्यमंत्री नेमल्यास पक्षाला लाभ होईल, असे सांगून काही मंत्र्यांनी हायकमांडवर दबाव आणला आहे. सिद्धरामय्या यांच्या गोटातील मंत्र्यांनी तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यासाठी वरिष्ठांवर दबाव आणल्याने राज्य काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षातील शिवकुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तीन उपमुख्यमंत्री नेमण्याची मागणी होत असल्याचे समजते. याची जाणीव असल्याने शिवकुमार यांनीही आपली व्यूहरचना केली आहे. हायकमांड पातळीवर असणाऱ्या आपल्या प्रभावाचा वापर करून अतिरिक्त उपमुख्यमंत्रिपदे निर्माण होणार नाहीत, यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या मनाविरुद्ध झाल्यास क्षणभरही मंत्रिमंडळात राहणार नाही. आपल्याजवळील उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष या नात्याने केवळ पक्षाच्या विजयासाठी लक्ष देईन, असा संदेश शिवकुमार यांनी रवाना केला आहे.
काँग्रेसश्रेष्ठींसमोर आव्हान
राज्यात काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना काँग्रेसश्रेष्ठींनी शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगितले. शिवाय भविष्यात पक्षनिष्ठेची दखल घेण्याचे आश्वासनही दिले होते. शिवकुमारांनीही आपल्याशिवाय कोणालाही उपमुख्यमंत्री बनवू नये, अशी अट घातली होती. सरकारला सहा महिने पूर्ण होण्याआधीच काही मंत्र्यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी वरिष्ठांवर दबाव आणला आहे. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठींसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
…तर अनुकूल होईल!
अतिरिक्त मुख्यमंत्रिपदे निर्माण केल्यास लोकसभा निवडणुकीत अनुकूल होईल, असे मत रणदीप सुरजेवाला यांच्यासमोर अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री बनविणे किंवा नकार देणे हा हायकमांडचा मुद्दा आहे. आम्ही आमचे मत मांडले आहे. साधकबाधक मुद्द्यांचा विचार करून वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्रिपदांविषयी निर्णय घेईल.
– डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री
कोण नकार देईल?
राज्यात तीन उपमुख्यमंत्रिपदाची मागणी सातत्याने केली जाईल. हायकमांडसमोर मागणी ठेवली आहे. अधिक उपमुख्यमंत्री नेमण्यास अनेक मंत्र्यांची संमती आहे. मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर कोण नकार देईल का?. मुख्यमंत्री बनण्याची अनेक नेत्यांना इच्छा आहे. मात्र, आता मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. भविष्यात पद रिक्त असेल तर त्यासाठीही मागणी करण्यात येईल.
– के. एन. राजण्णा, सहकार मंत्री
तीन मुख्यमंत्री नेमण्याचा प्रस्ताव नाही : खर्गे
राज्यात तीन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याविषयी पसरलेले वृत्त केवळ अफवा आहे. हायकमांडसमोर तीन मुख्यमंत्री नेमण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचेअ अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. तीन मुख्यमंत्री नेमण्यासंबंधी मंत्र्यांकडून उघडपणे वक्तव्ये केली जात असल्याने खर्गे यांनी हे स्पष्टीकरण दिले. कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, निवडणूक जवळ असताना असे मुद्दे चर्चेत येऊ नयेत. गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीवर मंत्र्यांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.









