छायाचित्रे आले समोर : 3 दिवसात आणखी 13 द्वार लावले जाणार
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिरातील सोन्याच्या द्वाराचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. हे द्वार सुमारे 8 फूट उंच आणि 12 फूट रुंद आहे. हे द्वार प्रथम मजल्यावर लावण्यात आले आहे. आगामी 3 दिवसांमध्ये आणखी 13 द्वार लावण्यात येणार आहेत.
गर्भगृहात केवळ एक द्वार असणार आहे. याच्या चौकटीच्या वर भगवान विष्णूचे शयन मुद्रेत चित्र कोरण्यात आले आहे. राम मंदिरात एकूण 46 द्वार असणार असून यातील 42 द्वारांवर 100 किलो सोन्याचे आच्छादन दिले जाणार आहे. पायऱ्यांनजीक 4 द्वार लावण्यात येणार असून त्यांना सोन्याने आच्छादिले जाणार नाही. हे दरवाजे महाराष्ट्रातून आणल्या गेलेल्या लाकडाद्वारे तयार करण्यात आले आहेत. या द्वारांवर हैदराबादच्या कारागिरांनी नक्षीकाम केले आहे.
रामलल्लासाठी सुवर्ण सिंहासन तयार केले जाणार आहे. हे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. मंदिराचे शिखर देखील सोन्याचे असणार आहे, परंतु हे कार्य पुढील काळात पूर्ण केले जाणार आहे.
एक किलो सोने, सात किलो चांदी
मंदिरात भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांच्या चरण पादुकादेखील ठेवण्यात येणार आहेत. या चरण पादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीने तयार करण्यात आल्या आहेत. हैदराबाद येथील श्रीचल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी त्यांची निर्मिती केली आहे.
18 पासून मूर्ती अधिवास
18 जानेवारीपासून मूर्ती अधिवास प्रारंभ होणार आहे. त्यादिवशी सकाळ-संध्याकाळ जलाधिवास होईल. 19 रोजी सकाळी फळ आणि संध्याकाळी धान्य अधिवास होईल. 20 जानेवारी रोजी सकाळी पुष्प, संध्याकाळी रत्न अधिवास होईल. 21 रोजी सकाळी शर्करा, मिष्ठान आणि मधु अधिवास होईल. संध्याकाळी औषधी आणि शय्या अधिवास होईल. भगवान राम सूर्यवंशी असल्याने द्वादश अधिवास होत आहेत. 22 रोजी रामलल्लाच्या विग्रहाच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जाईल आणि त्यांना दर्पण दाखविण्यात येईल, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि धर्माचार्य संपर्कप्रमुख अशोक तिवारी यांनी दिली आहे









