वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे मंगळवारपासून विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या मलेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. 2024 हे ऑलिम्पिक वर्ष असल्याने भारताच्या बॅडमिंटनपटूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष राहिल.
आगामी चार महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंना आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत जागतिक मानांकनातील पहिल्या 16 बॅडमिंटनपटूंमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना स्थान मिळवावे लागेल. पुरूष एकेरी मानांकनात सध्या एच. एस. प्रणॉय हा आठव्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात प्रणॉयने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि मलेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांनी या स्पर्धेत कांस्यपदके मिळविली. मलेशिया बॅडमिंटन स्पर्धेत 31 वर्षीय प्रणॉयचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या अँटोनसेन बरोबर होणार आहे. 2023 साली कोरिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकणाऱ्या अँटोनसेनचे दुखापतीनंतर या स्पर्धेत पुनरागमन होत आहे.
पुरूष एकेरीच्या मानांकनातील पहिल्या 16 खेळाडूत स्थान मिळविण्यासाठी लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यांच्यात गेल्या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात चुरस निर्माण झाली होती. लक्ष्य सेनने कॅनडा खुली सुपर 500 दर्जाची स्पर्धा जिंकल्यानंतर तो सुर मिळविण्यासाठी झगडत राहिला. किदांबी श्रीकांत सध्या एकेरीच्या मानांकना 24 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात त्याने चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
पुरूष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने दर्जेदार कामगिरी गेल्या वर्षीच्या बॅडमिंटन मौसमात केली. या जोडीला 2023 चा बॅडमिंटन हंगाम यशस्वी ठरला. या जोडीने 12 महिन्यांच्या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक त्यानंतर इंडोनेशिया सुपर 1000 दर्जाच्या स्पर्धेत, कोरिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या स्पर्धेत आणि स्विस खुल्या सुपर 300 दर्जाच्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या पुरूष दुहेरीच्या मानांकनामध्ये या जोडीने काही कालावधीत अग्रस्थानही पटकाविले होते. या मानांकन यादीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीय मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या या जोडीने उपांत्य फेरी गाठली होती. महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि तनिषा क्रेस्टो यांना दर्जेदार कामगिरीसाठी झगडावे लागेल. ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद ही भारतीय जोडी आगेकूच करण्यासाठी सज्ज झाली आहे. अश्विनी आणि तनिषा यांनी गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ही दुखापतीतून थोडीफार सावरली आहे. मात्र मलेशियन स्पर्धेत महिला एकेरीत भारताची एकही स्पर्धक यावेळी सहभागी होणार नाही. तसेच मिश्र दुहेरीतही भारताचा सहभाग राहणार नाही. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जागतिक टूरवरील सुपर 100 दर्जाच्या एकुण चार स्पर्धा असून मलेशिया खुली ही त्यापैकी एक आहे. अखिल इंग्लंड चॅम्पियनशिप, चीन खुली आणि इंडोनेशियन खुली या तीन स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे.









