महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक येथील शिवस्मारक सभागृहात रविवारी दुपारी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सचिव आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळण्यासंदर्भात तसेच फलकावरील कन्नड सक्तीबाबत कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात काही क्रम घेता येते का, याबाबत मत मांडण्यात यावे, अशी सूचना केली. या बैठकीत हुतात्मा दिन गांभीर्याने पाळून सकाळी 8.30 वाजता स्टेशनरोडवरील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व समिती कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, तसेच हुतात्मा दिन तालुक्यात गांभीर्याने पाळण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच फलकावरील 60 टक्के कन्नड सक्तीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना 9 जानेवारी रोजी निवेदन देण्यात येणार आहे. याला खानापूर समितीने पाठिंबा जाहीर केला असून या मोर्चात खानापूर तालुका समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे ठरविण्यात आले.
मध्यवर्ती समितीच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. या धरणे कार्यक्रमालाही पाठिंबा जाहीर करण्यात आला असून या धरणे कार्यक्रमा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सीमाभागातील नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासाठी मुंबई येथील विधान भवनात मदत कक्ष उघडण्यात आले आहे. तालुक्यातील कुणाला वैद्यकीय सेवेची मदत लागल्यास त्यांनी खानापूर तालुका म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, मारुती परमेकर, संजू पाटील, सीमासत्याग्रही शंकरराव पाटील, प्रकाश चव्हाण, रणजीत पाटील, शिवाजी पाटील, गोपाळ हेब्बाळकर, राजेंद्र अंद्रादे, राजाराम देसाई, अमृत शेलार, डी. एम. भोसले, कृष्णा कुंभार, रामचंद्र गावकर, विठ्ठल गुरव, जानबा वारके, कृष्णा मन्नोळकर, कृष्णा राणे यासह पदाधिकारी उपस्थित होते.









