माळमारुती पोलिसांचा नागरिकांच्या मदतीने उपक्रम : घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांतील वाढत्या चोऱ्या, घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. माळमारुती पोलिसांनी ज्या परिसरात चोऱ्या वाढल्या आहेत, त्या परिसरात ढोल वाजवत नागरिकांमध्ये जागृती सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री रामतीर्थनगर परिसरातील नागरिकांना सतर्क करण्यात आले.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी व त्यांचे सहकारी या मोहिमेत भाग घेत आहेत. यासाठी पोलिसांनी स्थानिक कार्यकर्त्यांचीही मदत घेतली असून ढोल वाजवत कार्यकर्ते परिसरात फिरल्यानंतर स्थानिक नागरिकांना एकत्रित करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
सध्या माळमारुती, शहापूर, टिळकवाडी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या घरफोड्या पाठीमागचा दरवाजा फोडून केल्या जात आहेत. यावर जागृती करण्यात येत असून पाठीमागचा दरवाजाही मजबूतपणे बंद केल्याची खात्री करून घेण्याचे सांगण्यात आले. परगावी जाताना नागरिकांनी पोलिसांना कल्पना द्यावी, बिट पोलिसांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तरी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घर बांधकाम व सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र सुरक्षेचा विचार अनेक जण करीत नाहीत. आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, परगावी गेले असतानाही घरासमोर काय चालले आहे, हे आहे तेथून पाहता येणार आहे. तंत्रज्ञानातील बदलाचा वापर करून आपल्या व आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात. मदतीला पोलीस आहेतच, असे आवाहन या परिसरात करण्यात आले.
प्रत्येक गोष्टीत काळजी घेतली तरच चोऱ्या टाळता येणार
नागरिकांनी दागिने लॉकरमध्ये ठेवावेत. घरी ठेवले तरी कपाटात ठेवू नयेत. चोरटे एखादे घर फोडल्यानंतर थेट बेडरूममधील कपाटालाच हात घालतात. अनेक जण बाहेर जाताना कपाटाला कुलूप लावून त्याची चावी तेथेच सोडतात. त्याचाही फायदा चोरट्यांना होतो. प्रत्येक गोष्टीत काळजी घेतली तरच चोऱ्या टाळता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी केले आहे.









