लोखंड, सिमेंट दरात घसरण : घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
बांधकाम साहित्य दरात घट होत आहे. त्यामुळे घरकुलचे स्वप्न बघणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लोखंड, सिमेंट, विटा, वाळू आणि इतर साहित्याचे दर 10 टक्क्यांनी उतरले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला वेग येईल, असा अंदाज आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रतिटन लोखंडाचा दर 80 हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या लोखंड 58 हजार रुपये प्रतिटन मिळू लागले आहे. त्याचबरोबर 360 रुपये असणारी सिमेंटची पिशवी 320 रुपये झाली आहे. विटा 34 हजार तर वाळू 16 हजार रुपयावर स्थिर आहे.
अलीकडे प्रत्येक कुटुंबाला स्वत:चे घरकुल असावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राचा वेग वाढला आहे. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल आणि अपार्टमेंटचाही विस्तार वाढू लागला आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याला मागणी वाढली आहे. सद्यपरिस्थितीत बांधकाम साहित्याच्या दरात घट झाली आहे. मात्र या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या गवंडी आणि सेंट्रिंगची मजुरी वाढली आहे.
घर, हॉटेल, फ्लॅट आणि इतर बांधकामासाठी लोखंड, वाळू, विटा, सिमेंट, खडी, चरे आदींची गरज असते. मात्र यापैकी लोखंड, सिमेंट आणि वाळूच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे बांधकाम करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वतंत्र कुटुंबामुळे स्वतंत्र घरकुलाची संकल्पना पुढे येवू लागली आहे. त्यामुळे दरवर्षी नवीन घरांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय तेजीत सुरू आहे.
वाळू, विटांसह मजुरी स्थिर : सोमनाथ भडांगे-गवंडी कामगार
दोन वर्षांपूर्वी लोखंडचे दर 80 हजार रुपये टन झाले होते. ते आता 55 हजार रुपयांपर्यंत आले आहेत. सिमेंट पिशवीही 400 हून 310 रुपयांपर्यंत आली आहे. बांधकाम साहित्य दरात काहीशी घट झाली आहे. मात्र वाळू, विटा आणि मजुरी स्थिर आहे.









