साडेतीन लाखांचे दागिने चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात : बेळगावातील माळमारुती पोलिसांची तत्पर कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
लग्नाच्या वऱ्हाडात सामील होऊन साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली व्हॅनिटी बॅग पळविणाऱ्या वृद्धाला टक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून हा वृद्ध पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्तियाज महम्मदगौस हुबळीवाले (वय 63) रा. पहिला क्रॉस, वीरभद्रनगर असे त्याचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी यांच्यासह एम. जी. कुरेर, सी. जे. चिन्नाप्पगोळ, बी. एफ. बस्तवाड, सी. आय. चिगरी, के. बी. गौराणी, जे. एन. भोसले, बी. एम. कल्लाप्पन्नावर, व्ही. एस. होसमनी, रवी बारीकर, एम. आर. मुजावर आदींचा समावेश असलेल्या पथकाने इम्तियाजच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. दावणगेरे येथील पंचाक्षरी एम. के. व त्यांचे कुटुंबीय नातेवाईकांच्या लग्न समारंभात भाग घेण्यासाठी गुरुवार दि. 4 जानेवारी रोजी बेळगावला आले होते. रामनगर परिसरातील विद्याधिराज मंगल कार्यालयात हे कुटुंबीय लग्न समारंभात सहभागी झाले होते. याचवेळी पंचाक्षरी यांच्या पत्नीची व्हॅनिटी बॅग चोरीस गेली होती. या बॅगमध्ये 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व साडेतीन हजार रुपये रोख रक्कम होती. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पंचाक्षरी यांनी माळमारुती पोलीस स्थानकात येऊन फिर्याद दिली होती.
एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली. फुटेजमध्ये वधू-वर पक्षाशी संबंध नसलेला एक चेहरा मंगल कार्यालयात खुर्चीवर वऱ्हाडीसारखा बसलेला दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजवरील छबीवरून पोलिसांनी त्याचा शोध लावला. दागिने चोरणारा वीरभद्रनगर परिसरातील असल्याची माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. इम्तियाजने व्हॅनिटी बॅगमधून चोरलेले 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी चोरीच्या घटनेनंतर केवळ काही तासांत संशयिताच्या मुसक्या आवळून दागिने जप्त करणाऱ्या पोलीस पथकातील अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.