वृत्तसंस्था/ केपटाऊन
यशस्वी जैस्वालने दक्षिण आफ्रिकेतील मालिका आव्हानात्मक राहिल्याचे मान्य केले असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्याला सकारात्मक मानसिकता राखण्यास मदत केली, असे त्याने स्पष्ट केले आहे. भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली असून जैस्वाल सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क आणि केपटाऊनमधील न्यूलँड्स येथील चेंडू उसळणाऱ्या खेळपट्ट्यांवरील चार डावांत केवळ 50 धावा करू शकला.
रोहित शर्माने मला सकारात्मक मानसिकता राखण्यास मदत केली आणि आम्हाला नवीन चेंडूवर झटपट धावाही करायच्या होत्या, असे जैस्वालने सांगितले. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 79 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 23 चेंडूंत 28 धावा करून त्याने त्या विजयाचा पाया घातला. मला फक्त एक चांगली सुऊवात करून द्यायची होती आणि तेच माझ्या मनात होते. कारण आम्हाला सामना जिंकायचा होता. मागच्या तीन डावांतील खेळीतही मी तेच केले होते, असे त्याने सांगितले.
या 22 वर्षीय खेळाडूला माहीत आहे की, त्याने उसळत्या चेंडूचा तसेच स्विंगचा सामना करण्याच्या बाबतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हा दौरा माझ्यासाठी बरेच काही शिकवून जाणारा अनुभव ठरला. वातावरण वेगळे होते आणि प्रत्येक अर्थाने हा एक आनंददायी अनुभव होता. माझ्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांची मला जाणीव झालेली आहे, असे जैस्वालने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत चेंडू वेगळ्या पद्धतीने येतो आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला. पण आव्हाने होती हे मी मान्य करतो. हा अनुभव मला चांगल्या स्थितीत ठेवेल. कारण मी शिकत आहे आणि पुढील मालिकेदरम्यान सुधारण्याचा प्रयत्न करेन, असे जैस्वाल पुढे म्हणाला. हैदराबाद येथे 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही फलंदाजीची आक्रमक शैली कायम ठेवणार का, असे विचारले असता जयस्वालने नम्रपणे त्याचे खंडन केले. मला कोणतीही विशिष्ट शैली पाळायची नाही आणि असे नव्हे की, माझ्याकडे फक्त आक्रमक खेळ आहे. संघाच्या मागणीनुसार मी माझ्या खेळात बदल करू शकतो, याकडे त्याने लक्ष वेधले.









