वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पराभव स्वीकाराव्या लागलेल्या पहिल्या कसोटीत भारताला ‘जादा धार’ दाखविता आली नव्हती. परंतु दुसऱ्या कसोटीत मानसिक दृष्टिकोनातील बदलाने परिस्थिती बदलली, असे दुसरी कसोटी जिंकून भारताने मालिकेत बरोबरी साधल्यानंतर बोलताना के. एल. राहुलने सांगितले. सेंच्युरियनमध्ये भारताने पहिली कसोटी एक डाव आणि 32 धावांनी गमावली होती, परंतु संघाने दुसऱ्या कसोटीत दोन दिवसांत दक्षिण आफ्रिकेविऊद्ध सात गडी राखून विजय मिळवून गुऊवारी संस्मरणीय पद्धतीने बरोबरी साधली.
मला वाटते की, आम्ही आमच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी किंवा गोलंदाजीच्या बाबतीत 100 टक्के योगदान देत नव्हतो. आम्ही तयार होतो, पण ती अतिरिक्त धार किंवा तो अतिरिक्त धडाका गहाळ होता. याचे श्रेय दक्षिण आफ्रिकेलाही जाते, कारण त्यांनी आम्हाला त्या आत्मविश्वासापर्यंत पोहोचू दिले नाही, असे या 31 वर्षीय खेळाडूने ‘स्टार स्पोर्ट्स’ला सांगितले.
मात्र या धक्क्यातून झटपट सावरल्याबद्दल राहुलने संघाचे कौतुक केले आहे. फक्त नियोजन आणि दृष्टिकोनात थोडासा बदल झाला. म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही तयार नव्हतो असे म्हणू शकत नाही. आम्ही तयार होतो, पण काही वेळा परिस्थिती अशी येते की, प्रतिस्पर्धी खरोखरच तुमचे कसोटी सामन्यातील आव्हान संपवून तुम्हाला बाहेर फेकतो तसेच आम्हाला याची सवय नाही, असे राहुल पुढे म्हणाला.
गेल्या 4-5 वर्षांपासून आम्ही खरोखरच चांगली स्पर्धा करत आहोत आणि आम्ही भारताबाहेर मालिका जिंकलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यासाठी तयार नव्हतो आणि त्यामुळे आमच्यासाठी तो मोठा धक्का ठरला. पण आम्ही कसोटी क्रिकेट खेळण्याचा किती आनंद घेतो, आपल्या देशासाठी खेळणे किती महत्त्वाचे आहे आणि भारताबाहेरचा कसोटी विजय आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे यावरून स्पष्ट होते, असे तो पुढे म्हणाला.
पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने 408 धावा काढल्यानंतर भारताचे दोन्ही डाव 245 आणि 131 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारताने या दौऱ्याची योग्य प्रकारे तयारी केली नसल्याचा टीकेचा सामना करावा लागला होता. ‘एका दिवसात झालेला तो मानसिक दृष्टिकोनातील बदल होता. यावेळी आम्ही अधिक तयार होतो आणि लढण्यास सज्ज होतो. आम्हाला विजय मिळवायचा होता आणि आमचे काम खरोखरच चांगल्या पद्धतीने करायचे होते’, असे उद्गार राहुलने यावेळी काढले.









