भाजपची राज्य सरकारविरोधात निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चाद्वारे निवेदन
बेळगाव : अयोध्या येथे राम मंदिर उभारुन मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. असे असताना कर्नाटक सरकारकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना तीन दशकांपूर्वीच्या गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राज्य सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत आहे. त्यांच्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देत भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. राम मंदिराचे उद्घाटन लवकरच होणार आहे. असे असताना राम मंदिर उभारण्यासाठी तीन दशकांपूर्वी अयोध्या येथे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला राज्य सरकारकडून आता अटक करण्यात आली आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक करत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राममंदिर उभारण्यासाठी छेडलेले आंदोलन केव्हाच मिटले आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयाकडून निकालात काढला गेला आहे. देशातील केंद्र सरकारकडून राम मंदिर उभारुन ते आता लवकरच उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे. असे असताना राज्य सरकार 30 वर्षांपूर्वीचा गुन्हा आता उकरुन काढत आहे. एक प्रकारे राज्य सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना लक्ष्य करीत असल्याचे यावरुन स्पष्ट दिसत आहे. राज्यपालांनी याची दखल घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी भाजपकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
कन्नड साहित्य भवन येथून मोर्चाला प्रारंभ करून चन्नम्मा चौक येथे आंदोलन करून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार विठ्ठल हलगेकर, सोनाली सरनोबत यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









