वृत्तसंस्था/ शारजाह
येथे झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने यजमान संयुक्त अरब अमिरातचा रोमांचक लढतीत 4 गड्यांनी पराभव करून तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 20 धावांत 4 बळी टिपणाऱ्या नवीन उल हकला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.
अफगाणला 127 धावांचे विजयाचे आव्हान मिळाले होते. पण त्यांचे 6 गडी बाद झाल्यानंतर ते अडचणीत आले होते. त्यांना यावेळी 20 धावांची गरज होती. मात्र नजिबुल्लाह झद्रनने संयमी खेळ करीत अफगाणला संघर्षपूर्ण विजय मिळवून दिला. त्यांनी 18.3 षटकांत 6 बाद 128 धावा जमविल्या. सलामीवीर हजरतुल्लाह झझाई व रहमानुल्लाह गुरबाज 3.1 षटकांत 30 धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली होती. गुरबाज बाद झाल्यानंतर कर्णधार इब्राहिम झद्रनने डाव सावरला होता.
तत्पूर्वी संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण नवीन उल हकच्या वेगवान माऱ्यापुढे ते अडचणीत आले. कर्णधार मुहम्मद वासीमने झुंजार खेळ करीत सर्वाधिक 27 धावा जमवल्या तर अली नसीरने 21 धावा जमविल्याने यूएईला 20 षटकांत 9 बाद 126 धावा जमविता आल्या. नवीन उल हकने 4 तर कैस अहमदने 24 धावांत 3 बळी टिपले. या मालिकेतील पहिले दोन सामनेही अटीतटीचे झाले होते. अफगाण पहिला सामना 72 धावांनी जिंकल्यानंतर यूएईने दुसरा सामना केवळ 11 धावांनी जिंकून बरोबरी साधली होती. अफगाणने तिसऱ्या सामन्यात जिगरबाज खेळ केल्यामुळेच त्यांना ही मालिका जिंकता आली.
संक्षिप्त धावफलक : यूएई 20 षटकांत 9 बाद 126 : वसीम 27, अली नसीर 21, नवीन उल हक 4-20, कैस अहमद 3-24. अफगाण 18.3 षटकांत 6 बाद 128 : हजरतुल्लाह झझाई 36, मुहम्मद नबी 13 चेंडूत नाबाद 28, इब्राहिम झद्रन 23, जुनैद सिद्दिकी 2-32









