वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणच्या मते सेंच्युरियन कसोटीने वेगवान गोलंदाजी विभागातील अडचणी उघड केल्यामुळे भारताने यंदा त्यांच्या वेगवान माऱ्याची राखीव ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यात मोहम्मद शमीची अनुपस्थिती खूप प्रकर्षाने जाणवली.
पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडून फारशी साथ न मिळालेला जसप्रीत बुमराह हाही दुखापतींचा धोका असलेला खेळाडू आहे. नवीन वर्षात भारताला सुधारणा करणे आवश्यक असलेल्या क्षेत्रांवर एका टीव्ही वाहिनीशी बोलताना पठाण म्हणाला की, भारताने यंदा एक चांगला वेगवान गोलंदाजी विभाग तयार करण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेत जे काही घडले ते आम्ही पाहिलेले आहे. शमी नव्हता आणि राखीव खेळाडूही तयार नव्हते.
आपण यापूर्वी पाहिले आहे की, बुमराहला दुखापत होऊ शकते. जर आम्ही वेगवान गोलंदाजीचा मोठा विभाग तयार केला नाही, तर आम्हाला त्यांच्यासारखे (बुमराह, शमी) दर्जेदार वेगवान गोलंदाज मिळणार नाहीत. सर्वोच्च स्तरासाठी तुमच्याकडे 7 ते 8 वेगवान गोलंदाज तयार असणे आवश्यक असते, याकडे पठाणने लक्ष वेधले.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते, भारतीय संघात तऊणाई आणि अनुभव यांचा योग्य मिलाफ हवा. सर्वांत जास्त लक्ष तऊणाई आणि अनुभवाचे चांगले मिश्रण साधण्यावर असले पाहिजे. कारण ते नेहमीच उपयोगी पडते. तऊण रक्ताच्या उत्साहापुढे संतुलन साधण्यासाठी शांत डोक्याची गरज असते, असे यावेळी गावस्कर म्हणाले.
भारताने योग्य वेळी रोहित शर्माकडून पदभार स्वीकारण्यासाठी कर्णधार तयार केले पाहिजेत, असे पठाण म्हणाला. नेतृत्व हे आणखी एक असे क्षेत्र आहे ज्यावर आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्याकडे 2-3 संभाव्य कर्णधार तयार असणे आवश्यक आहे. कारण या वर्षी आपण बरेच बदल पाहू शकतो. पाच वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये भारताने कोहलीच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली. रोहितनेही आम्हाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले आणि आम्ही त्याच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला. आम्ही त्यांच्यासारखे कर्णधार तयार करण्याची गरज आहे, असे त्याने पुढे सांगितले.









