थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांनी शिवारात कचरा, बाटल्यांचा चुराडा
बेळगाव : नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने ओल्या पार्ट्यांना रविवारी रात्री ऊत आला होता. विशेषत: शहराजवळील शिवारात पार्ट्यांसाठी गेलेल्या तरुणांनी धिंगाणा घालून पिकांचे नुकसान केले आहे. शिवाय दारू ढोसून रिकाम्या बाटल्या फेकून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना इजा पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला तळीरामांची मजा… अन् शेतकऱ्यांना सजा! असे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यंदा योगायोगाने विकेंडलाच (रविवार) इयरएंड आल्याने सकाळपासूनच साऱ्यांची लगबग सुरू होती. ओल्डमॅनबरोबरच पार्ट्यांचे नियोजन सुरू होते. विशेषत: थर्टी फर्स्ट धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी शेतीला पसंती देण्यात आली होती. दरम्यान, याठिकाणी ओल्या पार्ट्या करून मद्यधुंद अवस्थेत बाटल्या, पत्रावळ्या, पिशव्या, ग्लास फेकून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवारात कचरा निर्माण झाला आहे. काचेच्या बाटल्या शिवारातच फेकून देण्यात आल्याने शेतकऱ्यांना काम करणे धोक्याचे बनले आहे. तर काही तरुणांनी मद्यधुंद अवस्थेत उभ्या पिकात धुडगूस घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. अलीकडे शिवारात ओल्या पार्ट्यांचे प्रकार वाढू लागले आहेत. याला लगाम घालण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. बटाटा, भाजीपाला, भुईमूग, वाटाणा, हरभरा, मसूर आदींची पेरणीही सुरू आहे. विशेषत: शहराशेजारी असलेल्या बसवण कुडची, अलारवाड, जुने बेळगाव, हलगा, मंडोळी, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी, अलतगा, काकती, होनगा आदी परिसरात थर्टी फर्स्टच्या ओल्या पार्ट्या रंगल्या होत्या. काही तरुणांनी अतिउत्साहाच्या भरात बाटल्यांचा चुराडा केला आहे. पोलीस प्रशासनाने तळीरामांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.









