तब्बल 3 लाख रुपये देणगी देऊन राबविला वेगळा उपक्रम
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल हा मराठमोळा बाणा उराशी बाळगून येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेचे 1993-94, 1997-98 व 2003-2004 सालातील माजी विद्यार्थी आणि सावित्रीच्या मुली विद्यार्थिनींकडून नूतन शाळा बांधकामासाठी तब्बल 3 लाख रुपये देणगी देऊन एक वेगळा उपक्रम राबविला. शाळेचे बांधकाम माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी व उदार देणगीदारांच्या आर्थिक मदतीतून होत आहे. रविवारी शाळेच्या आवारात शाळेच्या विविध बांधकाम कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी व सिव्हिल इंजिनिअर राजकुमार पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील, यल्लोजी पाटील, दादासाहेब भदरगडे, संतोष कडोलकर, नितीन पवार, अमोल कोनेरी, राजू मन्नोळकर, मल्लाप्पा पाटील, गोपाळ पाटील, निरंजन जाधव आदी उपस्थित होते. निता सुळगेकर व सावित्रीच्या मुलींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन केले. बबीता कोनेरी यांनी सरस्वती फोटो पूजन केले. अमोल कानेरी यांनी श्रीफळ वाढविले. शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शंकर कोनेरी यांनी स्वागत केले. यल्लोजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. शाळेचे सिव्हिल इंजिनिअर राजू मन्नोळकर यांनी आपले विचार मांडले. माजी विद्यार्थी व विद्यार्थिंनींचा शाळा बांधकाम कमिटी व शाळा सुधारणा कमिटीच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अमोल कोनेरी यांच्याकडून 50 हजाराची मदत
दिवंगत निवृत्त जवान कल्लाप्पा कोनेरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपूत्र अमोल कोनेरी व बबीता कोनेरी यांनी शाळा बांधकामासाठी 50 हजार रुपयांची रोख मदत केली.
सावित्रींच्या मुलींचा खारीचा वाटा
शाळा बांधकामासाठी सावित्रींच्या मुलींनीही आर्थिक मदतीतून खारीचा वाटा उचलल्यामुळे उपस्थित जिजाऊ व सावित्रींच्या मुलींचे अभिनंदन करण्यात आले.
शाळेसाठी मिळालेली देणगी
1993-94 सालातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून 1 लाख 11 हजार रुपये, 1997-98 सालातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून 65 हजार रुपये, 2003-2004 सालातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून 51 हजार रुपये, यल्लाप्पा गोविंद निलजकर 5001 रुपये, श्रीकांत अष्टेकर 5001 रुपये. यावेळी शाळा सुधारणा कमिटी सदस्य, शाळा बांधकाम कमिटीसह शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थी-विद्यार्थिंनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शंकर कोनेरी यांनी केले. पत्रकार सदानंद चव्हाण यांनी आभार मानले.
मराठी माध्यम शाळांमध्ये पाल्यांना पाठवा
आज इंग्लिश माध्यम शाळांच्या इमेजमध्ये मनुष्य आपली संस्कृती विसरत आहे. आपली संस्कृती व मराठी भाषा टिकविण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यम शाळेमध्ये दाखल करून आपली मराठी भाषा टिकविण्याचे आवाहन माजी विद्यार्थिनी रेखा अष्टेकर यांनी केले.









