ट्रकचालक संपावर : अनेक राज्यांमध्ये चक्काजाम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात लागू झालेल्या नव्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मालवाहतुकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत. भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये झालेल्या दुरुस्तीनंतर हिट अँड रन प्रकरणी दोषी ठरलेल्या चालकांना 7 लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
हिट अँड रन विरोधी कायदा कठोर करण्याच्या प्रकाराला ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. तसेच संघटनेने चक्काजामचे आवाहन केल्यावर देशभरात संप सुरू झाला आहे. ट्रकचालक आणि मालवाहतुकदारांनी जयपूर, मेरठ, आग्रा एक्सप्रेस वे समवेत अनेक महामार्गांवर निदर्शने केली आहेत.
गुजरातमध्ये ट्रकचालकांनी राजकोट-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडी झाली. यादरम्यान जमावाने दगडफेक केल्यावर पोलिसांनी लाठीमार केला, ज्यात काही जण जखमी झाले आहेत. तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हा संप प्रामुख्याने काही निवडक राज्यांमध्येच होत असल्याने याचा फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे. भारतात 28 लाखाहुन अधिक ट्रक्स दरवर्षी 100 अब्ज किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापत असतात. देशात 80 लाखाहून अधिक ट्रकचालक असून ते मालवाहतूक करत असतात.
एआयएमटीसीची पुढील बैठक 10 जानेवारीला होणार असून यात सरकारसमोर भूमिका कशाप्रकारे मांडावी याचा निर्णय घेतला जाणार आहे. हिट अँड रन प्रकरणी कठोर पाऊल उचलण्याची गरज आहे. या नव्या कायद्यामागील सरकारचा उद्देश चांगला आहेत, परंतु प्रस्तावित कायद्यात अनेक त्रुटी असून त्या दूर करण्याची गरज असल्याचा दावा एआयएमटीसीचे अध्यक्ष अमृत मदान यांनी केला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वात मोठे योगदान परिवहन क्षेत्र आणि ट्रकचालकांचे आहे. भारत सध्या वाहनचालकांच्या कमतरतेला तोंड देत असताना सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. अशा स्थितीत 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद झाल्याने ट्रकचालक स्वत:चा पेशा सोडून देण्याचा विचार करतील असे मदान म्हणाले.
अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन प्रोटोकॉल
देशात अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन प्रोटोकॉलचा अभाव आहे. अशा स्थितीत दुर्घटना घडल्यास कुठल्याही चौकशीशिवाय मोठ्या वाहनाच्या चालकावर खापर फोडले जाते. दुर्घटना घडल्यावर चालक हा अनियंत्रित जमावापासून स्वत:ला वाचविण्यासाठी पळ काढत असतो. अशा स्थितीत शिक्षेची तरतूद आणि दंड ठोठावणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.









