छायाचित्राद्वारे रेल्वे स्थानकांची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे स्थानकाची व्यवस्था आणि उत्क्रांती जनसामान्यांना समजावी यासाठी शुक्रवारी रेल्वे स्थानकामध्ये स्टेशन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार मंगला अंगडी, मुरगेंद्रगौडा पाटील यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेसेवेला 136 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषत: रेल्वेच्या इतिहासाची माहिती प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांनाही देशातील मोठी रेल्वे स्थानके आणि त्यांचा इतिहास समजून घेता आला.
बेळगाव शहरात 1887 मध्ये रेल्वेसेवा सुरू झाली. त्यानंतर बेळगाव-मिरज मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचीही सोय झाली. शिवाय त्यानंतर बेळगाव येथून इतर शहरांनाही रेल्वेसेवा देण्यात आली. हा सारा इतिहास सर्वसामान्यांना समजावा यासाठी स्टेशन महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. यामध्ये पारंपरिक धनगरी ढोल पथकांनी वैशिष्ट्यापूर्ण सादरीकरण केले.
याप्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक संतोषकुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक संतोष हेगडे, प्रसाद कुलकर्णी, सदस्य, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.









