उच्च न्यायालयाकडून स्थगिती असताना आततायीपणा : शेतकऱ्यांनी विरोध करताच अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार
बेळगाव : रिंगरोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी झाडशहापूर येथे झाडांचा सर्व्हे तसेच दगड लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोलीस संरक्षणात आले होते. मात्र झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची प्रत दिली आणि त्यांना माघारी धाडले. यावेळी शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र स्थगितीची प्रत प्रांताधिकाऱ्यांकडे का दिला नाही? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. रिंगरोडबाबत केंद्र व राज्य सरकारने अधिकच गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. या रिंगरोडमध्ये तालुक्यातील 32 गावांतील सुपीक जमिनी जाणार आहेत. यामधील सर्वच शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार दिली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. त्यानंतर काही मोजक्याच शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली. झाडशहापूर येथील संपूर्ण गावाने एकजुटीने राहून उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांवर दडपशाहीचा प्रयत्न
शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वनविभागातील कर्मचारी आणि प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी पोलीस संरक्षण घेऊनच झाडशहापूरमध्ये दाखल झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना आम्ही न्यायालयातून स्थगिती घेतली आहे, असे सांगितले. त्यावर आम्हाला असा कोणताच आदेश आला नाही, असे सांगून शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची प्रत देताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. उच्च न्यायालयामध्ये झाडशहापूर येथील शेतकऱ्यांनी स्थगिती घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला न्यायालयामार्फतच प्रत गेली आहे. मात्र तरीदेखील आम्हाला प्रत मिळाली नाही. तुम्ही प्रांताधिकाऱ्यांना आतापर्यंत का प्रत दिली नाही, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. मात्र हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यानंतर पाय ठेवणे देखील गुन्हा आहे. असे असताना सर्व्हेसाठी हे अधिकारी गेल्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान पोलिसांसह अधिकारी दाखल झाले. त्यांनी झाडांचा सर्व्हे सुरू केला. याचबरोबर दगडही लावण्यास सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला. यावेळी गावातील भरमा नंदिहळ्ळी, परशराम गोरल, रमेश गोरल, सचिन गोरल, रामा नंदिहळ्ळी, मल्लाप्पा मरवे, भरमा येळ्ळूरकर, अनिल नंदिहळ्ळी, आकाश नंदिहळ्ळी यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही…
झाडशहापूर येथील शेतकऱ्यांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचे म्हणणे मांडताना महामार्ग प्राधिकरणाला राज्य शासनाच्या अखत्यारिमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाला पटवून देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
– अॅड. रवीकुमार गोकाककर









