वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारतीय संघाला येथे गुरुवारी पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आघाडी मिळविली असून आता. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी केप टाउन येथे खेळविली जाणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज आवेश खानला पाचारण करण्यात आले आहे.
सेंच्युरियनच्या वेगवान खेळपट्टीवर केवळ तीन दिवसात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीत धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी एक डाव आणि 32 धावांनी जिंकली. या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीची उणीव भारतीय संघाला चांगलीच भासत आहे. शमी तंदुरुस्तीच्या समस्येवरुन या मालिकेत खेळू शकला नाही. शमीच्या जागी आता निवड समितीने 27 वर्षीय आवेश खानला दुसऱ्या कसोटीसाठी संधी देण्याचे ठरविले आहे. सदर कसोटी 3 ते 7 जानेवारी दरम्यान केप टाउन येथे होणार आहे. आवेश खानने आतापर्यंत 38 प्रथम श्रेणी सामन्यात 22.65 धावांच्या सरासरीने 149 बळी मिळविले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकणाऱ्या भारतीय वनडे संघाचे प्रतिनिधित्व करताना आवेश खानने 6 गडी बाद केले होते. भारताचा अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या संघामध्ये आवेश खानचा समावेश करण्यात आला आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात बेनोनी येथे चार दिवसांचा सामना झाला आणि त्यामध्ये आवेश खानने 54 धावात 5 गडी बाद करत यजमान दक्षिण आफ्रिका अ संघाला पहिल्या डावात 263 धावात रोखण्यात आले.
पहिल्या कसोटीत भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला होता. पण बुमराहला इतर वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ मिळू शकली नाही, असे कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. बुमराहने या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या कसोटीत जडेजाला वगळून रवीचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली होती. पण तो प्रभावी ठरु शकला नाही. पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाला बराच काही बोध घेता येईल, अशी प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली आहे.









