शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप
बेळगाव : दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावू नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. असे असतानाही खासगी फायनान्सकडून शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने टिळकचौक येथील एका खासगी फायनान्स कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. रायबाग तालुक्यातील शेतकरी शिवकुमार बॅगी यांनी खासगी फायनान्स कंपनीकडून 27 लाखांच्या कर्जावर जेसीबी घेतला आहे. याचे नियमानुसार हप्ते भरण्यात आले आहेत. आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा अधिक कर्ज फेडण्यात आले आहे. तीन महिन्याचे कर्ज थकल्याने जेसीबी जप्त करण्यात आला आहे. हप्ता भरण्यासाठी आले असताना शेतकऱ्याला हुबळीला जाऊन हप्ता भरण्याचे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याने शेतकरी संघटनेकडून फायनान्स कंपनीच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. थकलेला तीन महिन्यांचा हप्ता भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला संपूर्ण कर्जाची रक्कम भरण्यासाठी कंपनीकडून तगादा लावला जात आहे. शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक केली जात असल्याच्या कारणावरून शेतकरी संघटनेकडून आंदोलन करून फायनान्स अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी रयत संघटनेचे नेते बिमशी गडाडी, शंकर मद्दीहळ्ळी, मुत्याप्पा बागण्णावर, भीमशी बॅगी, कामाण्णा बॅगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









