लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागृती
बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रांची जागृती करण्यात येत आहे. मतदारांकडून ज्या पक्षाच्या चिन्हावर मत घातले जाते. ते मत नेमक्या त्याच पक्षाला मिळते की नाही, याची जागृती करण्यासाठी शहरात मोहीम राबविण्यात आली. येथील खडेबाजार पोलीस स्थानकासमोर निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मतदान यंत्राची माहिती करून देण्यात आली. व्हिव्हिपॅट व मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना बोलावून याबाबतची माहिती देण्यात आली. मतदान यंत्राद्वारे मत घातल्यास कोणत्या चिन्हावर मत जाते, हे दाखविण्यात आले. जवळपास 100 पेक्षा अधिक नागरिकांना बोलावून प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. बीएलओ पी. एल. भातकांडे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यासाठी व मतदान यंत्रांची सत्यता पटवून देण्यासाठी प्रात्यक्षिक दाखविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी बीएलओ एल. एस. जैनोजी, सुपरवायझर चळगेरी, बीएलओ सुपरवायझर दोडमनी उपस्थित होते. खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.









