विविध मार्गांवर दररोज 30 ते 40 बसेस : विविध शाळांतून शैक्षणिक सहलींचे नियोजन, उत्पन्नातही वाढ
बेळगाव : बसचा तुटवडा अन् बसचालक आणि वाहकांची कमतरता अशा परिस्थितीत परिवहनने सहलींसाठी दैनंदिन 50 बसेसची तजवीज केली आहे. त्यामध्ये दररोज 30 ते 40 बसेस सहलीसाठी धावू लागल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलीतील बसेसचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात विविध शाळांतून शैक्षणिक सहलींचे नियोजन केले जाते. दरम्यान, शिक्षण खात्याने सहलींसाठी परिवहन मंडळाच्या बसेसनाच प्राधान्य द्यावे, असा आदेश दिला आहे. मात्र यंदा शक्ती योजनेमुळे सार्वजनिक बससेवेवर प्रचंड ताण वाढला आहे. परिणामी शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध होणे अडचणीचे ठरू लागले आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात अधिवेशनसाठी बसेस बुक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत सहलींसाठी बसेस उपलब्ध करणे अशक्य झाले होते. मात्र आता सहलींसाठी काही बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलींतील बसेसचा घोळ कमी होऊ लागला आहे.
परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता आहे. त्यामुळे दैनंदिन बससेवा पुरविताना परिवहनसमोर अडचणींचा डोंगर उभा राहू लागला आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या बसचालक आणि वाहकांच्या जागादेखील भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काहीवेळा बस उपलब्ध असूनदेखील बसचालक आणि वाहकांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि शैक्षणिक सहलींसाठी बस उपलब्ध करून देताना परिवहनची कसरत सुरू आहे. बेळगाव विभागात इतर आगारातून काही बसेस मागवून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे सहलीसाठी धावणाऱ्या बसेसची समस्या कमी झाली आहे. दरवर्षी दैनंदिन 40 ते 50 बसेस विविध मार्गावर सहलींसाठी धावतात. मात्र यंदा शक्ती योजनेमुळे सहलींसाठी धावणाऱ्या बसेसची संख्या रोडावली आहे. मात्र परिवहनकडून काही बसेस सहलींसाठी सोडल्या जात आहेत. सध्या 30 ते 40 बसेस सहलींसाठी धावू लागल्या आहेत, अशी माहितीही परिवहनने दिली आहे.
परिवहनसाठी हंगामाचा कालावधी
डिसेंबर, जानेवारी हा महिना परिवहन मंडळासाठी अधिक उत्पन्न देणारा आहे. या काळात पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक सहलींसाठी अतिरिक्त बसेस धावत असतात. त्यामुळे उत्पन्नातही वाढ होते. त्यामुळे परिवहनला डिसेंबर, जानेवारी या काळात उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जादा बस पुरविणे हितकारक आहे.
सहलींसाठी 50 बसेसची तजवीज : के. के. लमाणी-डीटीओ
शैक्षणिक सहलींसाठी 50 बसेसची तजवीज केली जात आहे. यापैकी दररोज 30 ते 40 बसेस सहलींसाठी धावू लागल्या आहेत. बसचालक, वाहक यांचे नियोजन करून बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हंगामी कालावधी असल्याने पर्यटन स्थळांनाही जादा बस सोडाव्या लागत आहेत.









