विजेचा अपव्यय टाळण्याची मागणी
बेळगाव : पावसाअभावी यंदा राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम वीज उत्पादनावर झाला आहे. विजेची समस्या भेडसावत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पथदीप दिवसा सुरू आणि रात्री बंद असा प्रकार सुरू आहे. याकडे अधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी आवारामध्ये गेल्या काही दिवसांपासून पथदीप दिवसा सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांकडून विजेची मागणी करत अनेकवेळा आंदोलने करण्यात येत आहेत. वीज टंचाईमुळे हेस्कॉमला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वीजपुरवठा करताना हेस्कॉमकडून नेहमीच वेळेचे बंधन पाळले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हेस्कॉमच्या नावे बोंब ठोकली जात आहे. असे असताना सरकारी कार्यालयांच्या आवारामध्ये विजेचा अपव्यय होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकरी व नागरिकांकडून या बेजबाबदार कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विजेचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी शासनाकडून नेहमीच जागृती केली जाते. मात्र जिल्ह्याच्या कार्यालयाच्या आवारामध्येच विजेचा अपव्यय होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू असलेला विजेचा अपव्यय थांबविण्यात यावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.









