अध्याय एकोणतिसावा
भगवंत निजधामाला गेल्याचे सांगून झाल्यानंतर नाथमहाराज उद्धवाचे पुढील कथानक सांगू लागले. ते म्हणाले, श्रीकृष्णाचे निर्वाण पाहून उद्धव तेथून निघाला. निघताना जगाचे विश्रामधाम असलेल्या, पुरुषांमध्ये पुरुषोत्तम असलेल्या श्रीकृष्णाला त्याने हृदयात स्थान दिले. आता त्याला विशालतीर्थाकडे जाण्याचे वेध लागले होते. श्रीकृष्णासाठी तो द्वारकेत राहण्यासाठी धडपडत होता पण श्रीकृष्णाचेच आता निधन झाल्याने त्याला आता तेथे राहण्यात काहीच स्वारस्य उरलेले नव्हते. त्यामुळे स्वानंदस्थितीत त्याने बद्रिकाश्रमाकडे प्रयाण केले. उद्धव पूर्णपणे स्वानंदस्थितीत असल्याने तो जेथे जेथे जात होता ते ते ठिकाण भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने पवित्र होत होते. साधकामध्ये जितकी म्हणून विवेक आणि विरक्ती येते तितकी त्याची बोध करायची शक्ती वाढत जाते. श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने विवेक आणि विरक्तीने परिपूर्ण झालेला उद्धव ज्ञान आणि भक्तीचा उपदेश करत जगाचा उद्धार करत पुढे निघाला होता. ज्याची ज्याची म्हणून उद्धवाशी गाठ पडली त्या सगळ्यांना हरीभजनाची मिठी पडत होती. उद्धवाने त्यांना आत्मा अमर आहे आणि देह नश्वर आहे हे समजावून सांगितले. तेव्हा नश्वर देहाचे त्यांना वाटत असलेले आकर्षण आपोआपच संपुष्टात आले. त्याचा परिणाम होऊन त्यांना संसाराचे भय वाटेनासे झाले. जे जे भगवद्भक्ती करतात त्या सर्वांना भागवत असे म्हणतात. उद्धव भागवत तर होताच पण मुक्तीनंतरही तो हरीभजन करत असल्याने निश्चितच महाभागवत पदाला पोहोचला होता. उद्धव ज्या आदराने भक्ती करत होता त्यामुळे नित्यमुक्ती त्याची दासी असल्याने त्याला ‘महाभागवत’ स्थिती प्राप्त झाली होती. मुळात निजशांतता अतिनिर्मळ असते आणि ती आत्मानुभवामुळे अतिप्रांजळ होते. उद्धव तर मोक्षप्राप्ती नंतरही भजन करणारा असल्याने तो विशाल झाला होता. असा हरीभक्तीमुळे विशाल झालेला उद्धव विशालतीर्थावर पोहोचला. ह्या विशालतीर्थाचे महात्म्य असे की, केवळ त्या तीर्थावर ज्याची श्रद्धा आहे त्याची चित्तशुद्धी होते. नुसतं त्या तीर्थाचे स्मरण जरी एखाद्याने केले तर त्याची बुद्धी निर्विकल्प होते. त्याच्या मनात सत्यवस्तू असलेल्या ईश्वराशिवाय इतर कोणतेच विचार येत नाहीत त्यामुळे त्याच्या चित्तात ईश्वरासंबंधी चिंतन सतत चालू असते. तो सतत नारायणाचे स्मरण करत असल्याने त्याला मोक्षसिद्धी प्राप्त होते. बद्रीकाश्रमाला विशालतीर्थ म्हणतात कारण तेथे समस्त लोकांचे हित व्हावे, भले व्हावे म्हणून नारायण अद्यापि अनुष्ठान करत आहेत. त्यामुळे जे साधक मोक्षमार्गाची वाटचाल करत आहेत त्यांच्यावर त्यांची पूर्ण कृपा होते. ह्या क्षेत्री जो साधक तप करेल त्याच्यावर नारायणाची पूर्ण कृपा होत असल्याने साधकाला तपाचे फल मिळवण्यासाठी येथे दीर्घकाळ तप करावे लागत नाही. अत्यंत कमी वेळ केलेल्या तपाचे प्रबळ फल मिळते. थोड्याशा ध्यानधारणेने सर्व गुह्य ज्ञान हातात येते. थोड्याशा विरक्तीने मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे मृत्युनंतर मिळणारी अवस्था असे काहीजण समजतात परंतु वस्तुस्थिती अशी नसून संपूर्ण समाधानी अवस्थेत असलेल्या साधकाला आहे ह्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे वाटू लागले की तो मोक्षपदी विराजमान होतो. ह्या तीर्थस्थानी साधकाला उपलब्ध वस्तू असल्या तर असुदेत, नसल्या तरी फरक पडत नाही असे वाटू लागले की, त्याला विरक्ती असे म्हणतात. ह्या तीर्थस्थानाच्या महात्म्याने अशी विरक्ती थोडा काळ जरी आली तरी नारायणाच्या कृपेने तो मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणून ह्या क्षेत्राला विशाल तीर्थ असे म्हणतात. जगाचा सुहृद बंधु असलेल्या उद्धवाच्या अंतर्यामीं गोविंदाशिवाय कोणीच नव्हतं हे पाहून भगवंतांनी उद्धवाला निजबोध केला.
क्रमश:








