नगरसेवकांची मागणी : एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार
बेळगाव : यावर्षी पाणी समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन सूचना करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने स्वतंत्र बैठक घ्यावी, अशी मागणी महापालिकेच्या सभागृहामध्ये सर्वच नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर शोभा सोमणाचे यांनी 15 दिवसांपूर्वी याबाबत बैठक घेण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा चार दिवसांत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. बुधवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. प्रारंभी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सफाई कर्मचारी विनायक लाखे याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच निधीच्या वाटपावरून गोंधळ उडाला. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा झाली. सध्या शहरामध्ये विविध ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. तेव्हा पाणी समस्या सोडविण्यासाठी पाऊल उचलणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
एलअॅण्डटी कंपनीबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. याचबरोबर काम करताना येणाऱ्या समस्या सांगितल्या. मात्र नगरसेवकांनी यापूर्वी पाणीपुरवठा मंडळाने योग्यप्रकारे पाणीपुरवठा केला होता. मात्र आता एलअॅण्डटी कंपनीमुळे समस्या निर्माण झाल्याचा आरोप केला. विरोधी गटाचे नगरसेवक मुज्जम्मील डोणी, नगरसेवक अजिम पटवेगार, नगरसेवक रवी साळुंखे यांनी कूपनलिका दुरुस्त करताना एलअॅण्डटी कंपनीला अडचणी येत आहेत. तेव्हा त्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली. सध्या शहरामध्ये 786 कूपनलिकांना विद्युत मोटारी बसविण्यात आल्या आहेत. तर 200 कूपनलिकांना हॅन्डपंप आहेत. 68 कूपनलिका खुल्या आहेत. त्यांना अजूनही विद्युत मोटारी किंवा हॅन्डपंप बसविण्यात आले नसल्याची माहिती अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी दिली. त्यावर नगरसेवकांनी तातडीने दुरुस्ती करावी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी आपल्या प्रभागामध्ये असलेल्या जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. त्यावर निश्चितच समस्या सोडवू, असे आश्वासन देण्यात आले. या प्रश्नानंतर स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांबाबत स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका आफरीन बानु बळ्ळारी यांनी माहिती दिली. स्मार्ट सिटी 2 मध्ये बेळगावचा समावेश झाला तर शहराला 135 कोटी रुपये मिळू शकतात. मात्र त्यासाठी महापालिकेमध्ये ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्या प्रस्तावाला सर्वांनीच मंजुरी दिली आहे. लेंडीनाल्याची सफाई गेल्या काही वर्षांपासून झाली नाही. त्यामुळे मुचंडीमळा, हुलबत्ते कॉलनी, तसेच शहराच्या इतर परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातील विहिरींचे पाणीही दूषित झाले आहे. डासांचा प्रादूर्भावही वाढला आहे. तेव्हा या नाल्याची सफाई करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. जर सफाई झाली नाही तर आमरण उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला. त्यावर महापौरांनी तातडीने अधिकाऱ्यांना सूचना करून नाल्याची सफाई करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक शंकर पाटील, रियाज, वैशाली भातकांडे, वाणी जोशी, वीणा विजापुरे, शिवाजी मंडोळकर, उपायुक्त उदयकुमार तळवार, रेश्मा तालिकोटी, आरोग्याधिकारी संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
क्रांतिवीरांचे पुतळे उभारताना चर्चा करून निर्णय घ्या
अनगोळ येथील प्रभाग क्रमांक 51 मधील तलावाजवळ क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी मांडला. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक अजिम पटवेगार यांनी शहरातील इतर ठिकाणीही नावे देणे, तसेच क्रांतिवीरांचे पुतळे उभारताना चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सांगितले.









