नागरिकांना माहिती नसल्याने होतोय गोंधळ
बेळगाव : हेस्कॉमच्या ग्रामीण उपविभाग-1 कार्यालयाचे काही दिवसांपूर्वी स्थलांतर करण्यात आले. परंतु याची माहिती नागरिकांना नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना फेरफटका मारावा लागत आहे. कार्यालयाचे स्थलांतर झाल्यानंतर त्याची माहिती हेस्कॉमने नागरिकांना देणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमधून हेस्कॉमच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. हेस्कॉम ग्रामीण उपविभाग-1 चे कार्यालय यापूर्वी नेहरूनगर येथील केएलई रोडवर होते. या कार्यालयाचे 4 डिसेंबरपासून गांधीनगर येथे स्थलांतर करण्यात आले. गांधीनगर येथील हेस्कॉमच्या इमारतीमध्ये नवे कार्यालय थाटण्यात आले आहे. ग्रामीण उपविभाग-1 व 2 हे दोन्ही विभाग एकत्रित ठेवण्यासाठी दोन्ही कार्यालये एकाच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहेत. अधिवेशन काळात कार्यालयाचे स्थलांतर होऊनदेखील याची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना हेस्कॉमकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही कामासाठी नेहरूनगर येथे गेलेल्या नागरिकांना गांधीनगरपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. वास्तविक संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती प्रसारमाध्यमांना देऊन जागरुक करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गांधीनगर येथील प्रशस्त जागेत कार्यालय
हेस्कॉम ग्रामीण उपविभाग-1 कार्यालयाला पुरेशी जागा मिळावी, यासाठी गांधीनगर येथील प्रशस्त जागेमध्ये कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. अधिवेशन काळात स्थलांतर करण्यात आले. नागरिकांनी विजेसंदर्भातील कामांसाठी यापुढे नेहरूनगरऐवजी गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयात संपर्क साधावा.
– राघवेंद्र, साहाय्यक कार्यकारी अभियंता









