कृष्णा पाटील मालिकावीर, अम्मार पठाण सामनावीर
बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आयोजित कल्याणी प्लायवूड 12 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निना स्पोर्ट्सने फिनिक्स अकादमीचा पराभव करून कल्याणी चषक पटकाविला. सामनावीर अम्मार पठाण, मालिकावीर कृष्णा पाटील यांना गौरविण्यात आले. फिनिक्स स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात निना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 2 गडी बाद 188 धावा जमवल्या. त्यात कृष्णा पाटीलने 11 चौकारांसह 68, झियानने 5 चौकारांसह 41 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना फिनिक्स अकादमीने 25 षटकात 8 गडी बाद 131 धावाच केल्या. त्यात अजय कतरालने 4 चौकारांसह 29, प्रीतम खडकनभावी 4 चौकारांसह 22 धावा केल्या. निनातर्फे अमिर पठाण 3, झियानने 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते भोमण्णा पोटे, अक्रम बाळेकुंद्री, किरण खडकनभावी, मंजुनाथ कतराल, सुनील बगाडे, महांतेश गवी, सुनील देसाई, माजिद मकानदार आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या निना, उपविजेत्या फिनिक्स संघाला चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर अम्मार पठाण, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर कृष्णा पाटील, उत्कृष्ट गोलंदाज अजान अजय कतराल यांना चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून अमोघ चौगुला, संदीप सनदी, प्रितम किदरापुरे, महांतेश व सुनील यांनी काम पाहिले.









